सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ; विद्यार्थ्यांसाठी उघडले नवे संधीद्वार

पालघर : राजतंत्र वृत्तसेवा

शिक्षणासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य संधी उपलब्ध करून देणे हे सामाजिक संस्थांचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या अध्यक्षा प्रज्ञा मेहता यांनी केले. त्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात नव्याने उभारण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.

पालघर परिसरातील विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अधिकाधिक सहभाग घेऊन यश संपादन करावे, या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट आणि रोटरी क्लब पालघर यांच्या संयुक्त पुढाकारातून सुमारे ७० लाख रुपयांच्या खर्चातून हे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रामार्फत विविध क्षेत्रांतील स्पर्धा परीक्षांची माहिती तसेच अभ्यासाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.

रोटरी क्लब पालघरचे अध्यक्ष संजय महाजन यांनी हा उपक्रम आपल्या स्वप्नातील प्रकल्प असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत आभार व्यक्त केले. रोटेरियन भगवान पाटील यांनी रोटरीच्या जागतिक कार्याचा परिचय करून दिला.

अध्यक्षीय समारोपात सीए सचिन कोरे यांनी संस्थेच्या विकासाचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले. शिक्षणासाठी मिळालेली आर्थिक मदत योग्य ठिकाणी वापरली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रशिक्षण केंद्रासाठी साई सर्विस प्रायव्हेट लिमिटेड, प्रज्ञा मेहता अँड फॅमिली, इन्फ्लूक्स हेल्थटेक लिमिटेड, आक्री ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड, गुफिक ग्रुप, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट क्रिकेट टीम, सुमंत नाईक अँड फॅमिली, जस्मा इंजिनिअरिंग एलएलपी, साची भाटिया आणि मालविका पॉल आदी उद्योग समूहांनी भरीव आर्थिक सहकार्य केले.

कार्यक्रमास सुकेतू जरीवाला, नीता भाटिया, डॉ. मुनीर चांदीवाला, धीरज मेहता, सुमन नायर, कानिर भाटिया, महेश कोठारी, धृती शाह, सागर घरत यांसह उपाध्यक्ष सुधीर दांडेकर, कोषाध्यक्ष मंगेश पंडित, सचिव सुधीर कुलकर्णी, अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख आणि डॉ. तानाजी पोळ यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. विवेक कुडू यांनी केले.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button