पालघर : सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पालघर येथे शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता ‘राष्ट्रीय स्तरावरील अभियंता दिन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. अभियांत्रिकी भवनातील तिसऱ्या मजल्यावरील मेन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून ‘प्रकल्प प्रदर्शन’ आणि ‘पोस्टर बनवणे’ या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि नवकल्पनांच्या माध्यमातून शाश्वत भविष्य घडविण्यासह विविध क्षेत्रांत नवीन हितकारक उत्पादने विकसित करण्याच्या संकल्पनेवर या उपक्रमांचा भर राहणार आहे.
‘स्मार्ट अभियांत्रिकी तंत्र वापरून भविष्यातील शाश्वतता, नवीनता आणि सांख्यिक स्वरूपातील रचना’ याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे. विद्यार्थी, शैक्षणिक व औद्योगिक संस्था तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
