अवकाश मॉडेल्स, मोहिमांची माहिती तसेच प्रत्यक्ष वैज्ञानिक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
पालघर : सुस्मित तावडे


सेंट जॉन टेक्निकल अॅण्ड एज्युकेशनल कॅम्पस, पालघर येथे आयोजित विक्रम साराभाई अवकाश प्रदर्शन २०२६ चे भव्य उद्घाटन मान्यवर शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात पार पडले. भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील प्रगती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.
विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी ISRO च्या १२ सदस्यीय पथकाने उपस्थिती लावली होती. पथकाने भारताच्या अवकाश संशोधनातील उल्लेखनीय कामगिरी अधोरेखित करणारी विविध अवकाश मॉडेल्स, मोहिमांची माहिती तसेच प्रत्यक्ष वैज्ञानिक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.
उद्घाटन समारंभाची सुरुवात कॅम्पस गीत व सरस्वती वंदनेने झाली. अध्यक्षांच्या ध्वनिमुद्रित संदेशातून युवकांमध्ये नवोपक्रमशीलता आणि वैज्ञानिक विचारसरणी विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
डॉ. एस. पी. व्यास, निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी डॉ. सविता तौरो, डॉ. कमल शाह व सर्व विभागप्रमुखांच्या हस्ते ISRO च्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
सन्मानित मान्यवरांमध्ये डॉ. धनी राम राजक (गट संचालक, SAC-ISRO), सौ. दिशा दवे, राहुल भाडणे, अमित माळी, प्रणव पंड्या (विज्ञान संवादक), तसेच प्रदर्शन व्यवस्थापक व तंत्रज्ञ यांचा समावेश होता.
डॉ. सविता तौरो यांनी पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक प्रदर्शन आयोजित होणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. डॉ. कमल शाह यांनी सेंट जॉन कॅम्पसच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत भारताच्या वाढत्या अवकाश मोहिमांवर प्रकाश टाकला.
मुख्य अतिथी डॉ. एस. पी. व्यास यांनी भारताच्या अवकाश प्रवासाची प्रेरणादायी माहिती देत विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्याचे आवाहन केले.
यानंतर फीत कापून प्रदर्शन दालनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. SJCEM चे प्राध्यापक व विद्यार्थी, SJIS चे विद्यार्थी, विविध शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, शैक्षणिक प्रशासक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे प्रदर्शन गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधनाभिमुखता आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले..
