जागतिक आदिवासी दिनी पारंपरिक सुईणींचा सन्मान; बार-बिअर शॉपी चार तास बंद ठेवण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पालघर : भूमिसेना-आदिवासी एकता परिषदेतर्फे ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालघर येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, यंदाच्या कार्यक्रमात आदिवासी समाजातील पारंपरिक सुईणींचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यासोबतच रॅली शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी, यासाठी रॅलीच्या कालावधीत किमान चार तास बार व बिअर शॉपी बंद ठेवण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

यंदाचा जागतिक आदिवासी दिन “Honouring Indigenous Midwives: Safeguarding Life and Well-being” अर्थात “आदिवासी पारंपरिक सुईणींचा सन्मान – जीवन आणि आरोग्याचे संरक्षण” या जागतिक संकल्पनेवर साजरा होत असून, आदिवासी परंपरा, संस्कृती, लोककला आणि समाजातील पारंपरिक आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.

रॅलीदरम्यान काही समाजबांधव व्यसनाच्या आहारी जाऊन अनुचित प्रकार घडू नयेत आणि कार्यक्रमाचे पावित्र्य कायम राहावे, या उद्देशाने बार व बिअर शॉपी चार तास बंद ठेवण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच शहरातील स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि वाहतूक नियोजन करण्याबाबतही प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

या संदर्भातील बैठकीस भूमिसेना-आदिवासी एकता परिषदेचे गोपीनाथ चाकर, वंदना जाधव, नीता काटकर, परशुराम चावरे, दत्ता सांबरे, दत्ताराम करबट, अशोक ठाकरे आणि किशोर काटकर उपस्थित होते.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button