पालघर, दि. 3 जुलै : पालघर तालुक्यात मासेमारीसाठी गेलेल्या दोन व्यक्तींशी संबंधित दोन वेगवेगळ्या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका घटनेत ५५ वर्षीय व्यक्ती अद्याप बेपत्ता असून शोधमोहीम सुरू आहे, तर दुसऱ्या घटनेत २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह नाल्यात आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
पहिली घटना मौजे पेठ (केदारपाडा) येथे घडली असून विठ्ठल जान्या केदार (वय ५५) हे १ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सुर्या नदीवर मासेमारीसाठी गेले होते. मात्र, दिवस संपूनही ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नसल्याने याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक, ग्रामस्थ आणि संबंधित यंत्रणांनी सुर्या नदी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. नदीच्या काठावर तसेच आसपासच्या परिसरात कसून शोध घेतला जात असून अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.
दुसरी घटना मौजे चहाडे येथील असून चंदर किसन वरठा (वय २८) हे देखील रात्री मासेमारीसाठी गेले होते. मात्र, तेही परत न आल्याने त्यांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर गुरुवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास चहाडे येथील धानविपाडा परिसरातील नाल्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
या दोन्ही घटनांमुळे मासेमारीसाठी नदी-नाल्यांमध्ये जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने अशा घटना घडण्याची शक्यता अधिक असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.
