पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक; जिल्हा उपनिबंधक यांचे आवाहन
पालघर : महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ जाहीर केली असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ ऍग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन पालघर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक किशन रत्नाळे यांनी केले आहे.
राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ही योजना जाहीर केली असून, १५ जुलै २०२६ रोजीच्या पूरक शासन पत्राद्वारे योजनेतील काही निकषांमध्ये बदल करून काही अटी वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच पालघर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत कर्ज घेतलेल्या १३,०७४ पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी लवकरच शासनामार्फत जाहीर करण्यात येणार असून ती संबंधित सेवा सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा, तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रसिद्ध केली जाईल.
पात्र यादीतील शेतकऱ्यांनी ऍग्रीस्टॅक क्रमांकासह आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र किंवा जवळच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
योजनेचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळावा यासाठी अद्याप ऍग्रीस्टॅक नोंदणी न केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक किशन रत्नाळे यांनी केले आहे.
