राजीनामा शेवट नाही… तर विद्यार्थ्यांच्या न्यायलढ्याची सुरुवात!

देशाच्या लोकशाहीची खरी ताकद संसदेत नाही, तर रस्त्यावर न्याय मागणाऱ्या सामान्य नागरिकांमध्ये असते आणि त्या नागरिकांमध्येही सर्वात मोठी आशा असते ती विद्यार्थ्यांची. कारण विद्यार्थी जेव्हा पुस्तक बाजूला ठेवून आंदोलनाचा झेंडा हातात घेतात, तेव्हा समजून घ्यायचे की व्यवस्थेने त्यांना अभ्यासापेक्षा संघर्ष करायला भाग पाडले आहे.देशात गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षांबाबत निर्माण झालेला अविश्वास हा केवळ परीक्षेपुरता मर्यादित राहिलेला नाही. लाखो युवक-युवतींच्या स्वप्नांवर, त्यांच्या मेहनतीवर आणि भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा विषय ठरला आहे. परीक्षा म्हणजे गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी; पण जेव्हा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटना, गैरव्यवहाराचे आरोप आणि पारदर्शकतेबाबत शंका निर्माण होतात, तेव्हा सर्वाधिक नुकसान होते ते प्रामाणिक विद्यार्थ्यांचे.एका विद्यार्थ्याचे आयुष्य काय असते? घरच्यांची अपेक्षा, आर्थिक अडचणी, दिवस-रात्र केलेला अभ्यास, मित्र-मैत्रिणींपासून दूर राहून घेतलेले कष्ट आणि एकाच परीक्षेवर भविष्य अवलंबून असल्याची जाणीव. अशा परिस्थितीत जर परीक्षेवरच संशय निर्माण झाला, तर त्या विद्यार्थ्याच्या मनात निर्माण होणारी घालमेल शब्दांत मांडणे अशक्य आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे अनेकदा राजकीय नजरेतून पाहिले जाते. पण प्रत्येक आंदोलनामागे राजकारणच असते, असे मानणे हा सर्वात मोठा गैरसमज आहे. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरतात, तेव्हा ते सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर न्याय मिळवण्यासाठी उतरतात. त्यांना पक्ष नको असतो; त्यांना विश्वास हवा असतो.

विद्यार्थ्यांच्या आवाजाला वेळेत प्रतिसाद देण्याऐवजी त्यांना समजावण्याऐवजी जर कठोर कारवाईचा मार्ग स्वीकारला गेला, तर परिस्थिती अधिक चिघळते. लोकशाहीत आंदोलन हा गुन्हा नाही; तो संविधानाने दिलेला अधिकार आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी संघर्ष निर्माण झाला, तर त्यातून व्यवस्थेची प्रतिमा अधिकच मलिन होते.प्रश्न हा कोणत्या एका सरकारचा किंवा एका मंत्र्याचा नाही. प्रश्न आहे व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा. एखाद्या व्यक्तीचा राजीनामा झाला किंवा एखादा अधिकारी बदलला म्हणून सर्व प्रश्न संपत नाहीत. उलट, खरी सुरुवात त्यानंतरच होते. कारण प्रश्न व्यक्तीचा नसून व्यवस्थेचा असतो.आज देशातील प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी एकच मागणी करतो; निष्पक्ष परीक्षा, पारदर्शक प्रक्रिया आणि गुणवत्तेला न्याय. ही मागणी कोणत्याही राजकीय विचारसरणीविरुद्ध नाही. ही मागणी आहे आपल्या संविधानातील समान संधीच्या तत्त्वासाठी.

शासनानेही हे लक्षात घ्यायला हवे की, विद्यार्थ्यांचा विश्वास एकदा तुटला तर तो पुन्हा मिळवणे अत्यंत कठीण असते. परीक्षा घेतली जाऊ शकते, निकाल पुन्हा लावला जाऊ शकतो, पण विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली असुरक्षितता सहज दूर होत नाही.

आज आवश्यक आहे ती व्यापक सुधारणा. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते परीक्षा केंद्रांच्या व्यवस्थापनापर्यंत, तंत्रज्ञानाच्या वापरापासून ते जबाबदारी निश्चित करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर कठोर आणि पारदर्शक व्यवस्था उभी राहिली पाहिजे. दोषी कोणताही असो. राजकीय प्रभाव, आर्थिक ताकद किंवा पदाचा आधार न पाहता कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण एका दोषीला वाचवण्यासाठी हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लावणे हा समाजावरील अन्याय आहे.विद्यार्थ्यांनीही आंदोलन करताना शांतता, संयम आणि लोकशाही मार्ग सोडू नये. कारण हिंसा कोणाच्याही न्यायलढ्याला बळ देत नाही. विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे त्यांची नैतिक ताकद. ती कायम ठेवणे आवश्यक आहे.समाजालाही या प्रश्नाकडे “त्यांचा प्रश्न” म्हणून पाहता येणार नाही. आजचा विद्यार्थी उद्याचा डॉक्टर, अभियंता, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक किंवा शास्त्रज्ञ असतो. त्याच्या स्वप्नांशी खेळणे म्हणजे देशाच्या भविष्याशी खेळणे होय.

आजचा धडा स्पष्ट आहे. विद्यार्थी केवळ मतदार नाहीत; ते राष्ट्रनिर्माते आहेत. त्यांच्या प्रश्नांना केवळ राजकीय चष्म्यातून पाहिले, तर उद्याचा भारत कमकुवत होईल. विद्यार्थ्यांना न्याय देणे म्हणजे देशाच्या भविष्याला न्याय देणे होय.सरकार बदलू शकते, मंत्री बदलू शकतात, अधिकारी बदलू शकतात; पण विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी कृती बदलावी लागेल. आश्वासनांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची आहे. भाषणांपेक्षा विश्वास महत्त्वाचा आहे आणि सत्तेपेक्षा विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक महत्त्वाचे आहे.

‘दे धक्का’ एवढाच म्हणेल… राजीनामे ही लोकशाहीची अखेर नसते; ती जबाबदारी स्वीकारण्याची सुरुवात असते. खरी परीक्षा आता सत्तेची आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पुन्हा विश्वास निर्माण करायचा असेल, तर पारदर्शक व्यवस्था उभी करा. कारण विद्यार्थी हरला तर एक व्यक्ती हरत नाही. संपूर्ण राष्ट्राचे भविष्य हरते आणि भविष्य हरवणाऱ्या कोणत्याही व्यवस्थेला इतिहास कधीच माफ करत नाही.

मंगेश तावडे, 7721994698

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button