राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार कोकणच्या भजनपरंपरेचा गौरव
पालघर (मंगेश तावडे) : भक्ती, संगीत आणि संस्कृतीची अखंड सेवा करणारे ज्येष्ठ भजनी गायक कलाकार तथा भजनसम्राट नारायण बुवा वाळवे यांना त्यांच्या प्रदीर्घ कलासाधनेबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते त्यांचा गौरव होणार असून, हा सन्मान संपूर्ण कोकणातील भजनपरंपरेसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.
नारायण बुवा वाळवे यांचा जन्म १७ जून १९४३ रोजी कणकवली तालुक्यातील तोंडवळी येथे झाला. त्यांनी सन १९६० पासून भजन क्षेत्रात आपली साधना सुरू केली. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भजनकलेची सेवा करताना आपल्या मधुर गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. गुरुवर्य गणेशनाथ जाधव (गोसावी) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भजनकलेचे धडे घेतले. आज वयाच्या ८४व्या वर्षीही त्यांची भजनकलेप्रती असलेली निष्ठा आणि साधना प्रेरणादायी आहे.
नारायण बुवा यांनी केवळ स्वतःची कला जोपासली नाही, तर अनेक शिष्य घडवून भजनपरंपरेचा वारसा पुढे नेला. त्यांच्या शिष्यांची संख्या दीडशेहून अधिक आहे. डबलबारी भजन क्षेत्रात आपल्या कलेचा ठसा उमटविणारे बुवा संतोष मिराशी, पांडुरंग सावंत, देवेंद्र ईस्वलकर, बाळा राणे, नंदू पवार यांसह अनेक नामवंत कलाकार त्यांच्या मार्गदर्शनातून घडले आहेत. त्यामुळे त्यांचे योगदान केवळ एका कलाकारापुरते मर्यादित न राहता भजनकलेच्या पुढील पिढीला सुद्धा दिशा देणारे ठरले आहे.
सध्या भांडूप पूर्व, मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या नारायण बुवांनी कोकणच्या समृद्ध भजनपरंपरेला मुंबईसह महाराष्ट्रात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांना मिळणारा जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या तपश्चर्येची आणि कलासेवेची पोचपावती आहे.
अखिल मुंबई कोकण प्रसादिक भजन मंडळाच्या नालासोपारा–विरार–वसई शाखेच्या वतीने रविवार, २३ ऑगस्ट रोजी विरार पश्चिम येथील धिमही बँक्वेट हॉलमध्ये वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १.३० ते रात्री ९.३० या वेळेत होणाऱ्या या सोहळ्यात नारायण बुवांचा सन्मान होत असल्याने भजनप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
भजनकलेच्या अखंड साधनेला मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याचा गौरव तर आहेच; पण त्यांच्या शिष्यपरंपरेचा आणि कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचाही गौरव आहे. भजनसम्राट नारायण बुवा वाळवे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कलाप्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!
