अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळ आयोजित भजन क्षेत्रातील मान्यवरांना जीवन गौरव प्रदान
विरार : अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळ, नालासोपारा, विरार, वसई शाखेच्या वतीने आयोजित वर्धापन दिन सोहळा रविवारी विरार येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात शेकडो नवोदित तसेच अनुभवी भजन गायकांनी संपूर्ण दिवस अभंग, भजन आणि भक्तिगीते सादर करून उपस्थितांना भक्तिरसात चिंब भिजविले. त्यामुळे संपूर्ण परिसरातील वातावरण भारावून गेले होते.

या सोहळ्यात भजन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल बुवा नारायण वाळवे, भजन अलंकार पंडित बाळासाहेब वाईकर आणि रायगड भूषण प्रताप पाटील यांना मंडळाच्या वतीने मानाचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात भजन अलंकार पंडित बाळासाहेब वाईकर यांच्या सुरेल श्लोकाने झाली. त्यांना साथसंगत प्रताप पाटील व कुणाल पाटील यांनी केली, तर गायन साथ बुवा संजय गावडे व ज्ञानेश्वर कदम यांनी दिली. त्यानंतर ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या जयघोषाने भजनाचा रंग चढत गेला. पखवाजाचे कडाडणारे बोल आणि तबल्याच्या तालावर ‘जय जय राम कृष्ण हरी’चा गजर घुमू लागल्याने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

दिवसभर विविध भजन मंडळे आणि नवोदित गायकांनी अभंग व भक्तिगीते सादर केली. त्यांच्या उत्स्फूर्त गायनाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. नव्या पिढीतील गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत भजन परंपरा पुढे नेण्याचा मंडळाचा प्रयत्न या सोहळ्यात प्रकर्षाने दिसून आला.

या वेळी मंडळाचे अध्यक्ष विजय सावंत, उपाध्यक्ष मनोहर कोकाटे, सेक्रेटरी दादाजी नाईक यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भजनप्रेमी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. अभंग, टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या गजराने विरारचा परिसर अक्षरशः भक्तिमय झाला.

