पालघर : पालघर नगर परिषदेची निवडणूक २ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली असून, २१ डिसेंबर २०२५ रोजी निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत पालघर नगर परिषदेत शिवसेनेने मोठा विजय मिळवत थेट नगराध्यक्षपदासह १९ नगरसेवकांची बहुमताने निवड करून सत्ता स्थापन केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने अनुभवी नेत्या व सलग सात वेळा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या माजी नगराध्यक्ष डॉ. सौ. उज्ज्वला केदार काळे यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली आहे. तर नगरसेवक भावानंद संखे यांची सुद्धा भाजपाने गटनेतेपदी नियुक्ती केल्याने सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
गटनेतेपदी निवड झाल्यानंतर डॉ. उज्ज्वला काळे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख रविंद्र फाटक, जिल्हाप्रमुख कुंदन संखे, नगराध्यक्ष उत्तम घरत तसेच सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. “शिवसेनेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. सर्व नगरसेवकांना एकत्र ठेवून, त्यांना विश्वासात घेऊन काम करीन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.१९९५ पासून लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. काळे यांनी पालघरचा सर्वांगीण विकास हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे स्पष्ट केले. “पालघरचा विकास, विकास आणि विकास हाच माझा अजेंडा राहील,” असे त्यांनी सांगितले. नगर परिषदेत शिवसेनेचे थेट नगराध्यक्ष व १९ नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे ८ नगरसेवक, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ३ नगरसेवक निवडून आले आहेत.डॉ. काळे यांचे सोबत भाजपचे भावानंद संखे यांनी सुद्धा सलग तीन वेळा नगरसेवकपद भूषविले असून सलग दुसऱ्यांदा त्यांना भाजपने गटनेतेपदी बसविले आहे. विकासकामांच्या जोरावर आपण तिसऱ्या वेळी निवडणूक जिंकलो असून पक्षाने जी आपल्यावर जबाबदारी देऊन गटनेतेपदी वर्णी लावली त्याबद्दल संखे यांनी आभार व्यक्त केले आहेत. गत वेळेपेक्षा पुढील पाच वर्षांत विकासकामांचा धडका लावला जाईल. तसेच सहकारी नगरसेवकांना वेळोवेळी सहकार्य केले जाईल, असेही संखे म्हणाले.
