
पर्यटन, रोजगार आणि आर्थिक समृद्धीचा नवा अध्याय; शिरगाव समुद्रकिनाऱ्यावर इतिहास घडला
पालघर : मंगेश तावडे
ग्लोबल कोकण महोत्सवाच्या निमित्ताने शिरगाव गावाचे नाव आज एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले आहे. या भव्य आणि बहुआयामी महोत्सवाला आलेल्या पर्यटकांकडून अत्यंत उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद लाभला. संपूर्ण कार्यक्रम मोठ्या जल्लोषात, शिस्तबद्ध नियोजन आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या बळावर यशस्वीरीत्या पार पडला, याचा शिरगावच्या सर्व ग्रामस्थांना मनस्वी अभिमान वाटतो, असे प्रतिपादन शिरगावचे सरपंच घनश्याम ऊर्फ बाबलिन मोरे यांनी केले. महोत्सवानंतर श्री. मोरे बोलत होते.
ते पुढे म्हणाले, विशेष बाब म्हणजे आतापर्यंत आयोजित झालेल्या ११ ग्लोबल कोकण महोत्सवांपैकी सर्वाधिक गर्दी शिरगाव येथे झाल्याचा मान गावाला मिळाला आहे, ही बाब शिरगावसाठी अत्यंत गौरवास्पद असून कोकणातील पर्यटन नकाशावर गावाचे महत्त्व अधिक ठळकपणे अधोरेखित झाले आहे. महोत्सवाच्या कालावधीत सुमारे ४०० स्टॉल्स उभारण्यात आले होते. या स्टॉल्समधून तब्बल २.५ कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाल्याने स्थानिक व्यापार, खाद्यसंस्कृती, हस्तकला आणि नवउद्योजकतेला मोठी चालना मिळाली आहे.
या महोत्सवाचा सर्वात मोठा फायदा स्थानिक ग्रामस्थांना झाला. शिरगावमधील वाहनचालक, बचत गटातील महिला, समुद्रकिनाऱ्यावरील लहान दुकानदार, बोट नाविक, मच्छीमार तसेच इतर अनेक नागरिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे हा महोत्सव केवळ सांस्कृतिक उत्सव न राहता आर्थिक उन्नतीचे एक प्रभावी व्यासपीठ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
या यशस्वी आयोजनाबद्दल शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच घनश्याम (बाबलिन) मोरे यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावकरी तसेच कार्यक्रमाच्या यशासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या प्रत्येक घटकाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. विशेषतः पार्किंगसाठी स्वतःची जागा उपलब्ध करून दिलेल्या नागरिकांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे.
आगामी काळातही अशाच एकजुटीने भव्य कार्यक्रमांचे आयोजन करून नवउद्योजकांना संधी देत शिरगाव समुद्रकिनारा विकासाच्या नव्या दिशेने नेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. सामूहिक प्रयत्न, सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रभावी नियोजनाच्या बळावर शिरगावचा नावलौकिक भविष्यात आणखी वाढत राहील, असा विश्वास ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत असल्याचे सरपंच श्री. मोरे म्हणाले.
