पालघर : ग्रामपंचायत नावझे येथे शिवजयंतीचे औचित्य साधून गॅलेक्सी तारापूर यांच्या ‘समृद्ध गाव व्हिजन’ अंतर्गत ग्रामपंचायत नावझे येथे रेन हार्वेस्टिंग प्रकल्प, सौर प्रकल्प, प्लास्टिक संकलन केंद्र तसेच मधुमक्षिका पालन प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर राजेशजी खटावकर, CSR प्रमुख अमरजीत दास, HR प्रमुख संदीप राऊत, HR प्रमुख (तळोजा) कुनाल अरगर CSR मॅनेजर अमित गोरी, सागर पटेल CSR टीम उपस्थित होती. तसेच नारायण गांगूर्डे, विजय सुभार, केदार नाईक, राजेश सुधार, प्रसन्ना सोगले, राजतंत्र चे संपादक मंगेश तावडे, खादीग्रामोद्योग चे व्हाईस चेरमन प्रकाश कुराडे, वंदना जाधव मॅडम, हालोली गावचे ज्येष्ठ नागरिक हिराजी डोंगरे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, माजी पंचसमिती सदस्य, पोलीस पाटील, गावातील सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विविध पर्यावरणपूरक प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. रेन हार्वेस्टिंग प्रकल्पामुळे पावसाचे पाणी साठवून भूजल पातळी वाढीस मदत होणार आहे. सौर प्रकल्पाद्वारे स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढणार असून गावाच्या वीज बचतीस चालना मिळणार आहे. प्लास्टिक संकलन केंद्रामुळे कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे. तसेच मधुमक्षिका पालन प्रकल्पामुळे स्थानिक युवक व महिला बचत गटांना रोजगार व उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे.
यावेळी फॅक्टरी मॅनेजर राजेश खटावकर साहेब व CSR प्रमुख अमरजीत दास साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामपंचायतीस भेटलेल्या माझी वसुंधरा अभियान 5.0 राज्यस्तरीय प्रथम क्रमांक त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून कंपनी पुढील काळातही पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यास कटिबद्ध आहे. विशेषतः महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध कौशल्य विकास व रोजगाराभिमुख प्रकल्प हाती घेण्यात येणार असून ग्रामविकासासाठी सातत्याने सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवजयंतीच्या प्रेरणादायी दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य व स्वावलंबनाच्या विचारांना साजेसा हा उपक्रम ठरला असून ग्रामस्थांनी या प्रकल्पांचे स्वागत करून पर्यावरण संवर्धन व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
