मिरा–भाईंदर–वसई–विरारमध्ये ड्रोन व पॅराग्लायडरवर बंदी

सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलीस उप आयुक्तांचे मनाई आदेश

मिरा–भाईंदर : दहशतवादी व समाजविघातक कृत्यांची शक्यता लक्षात घेता मिरा–भाईंदर–वसई–विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर, रिमोट कंट्रोल मायक्रो लाइट एअरक्राफ्ट तसेच एरियल मिसाइल्सच्या वापरावर तात्पुरती मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अशोक तानाजी विरकर, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय व विशेष शाखा), मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) (२) अंतर्गत जारी केला आहे.

आदेशानुसार, संवेदनशील व संरक्षित ठिकाणांवर ड्रोन व तत्सम हवाई साधनांच्या माध्यमातून रेकी अथवा घातपाती कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच मानवी जीवन, आरोग्य व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बंदी आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मात्र, पोलीस विभागाकडून करण्यात येणाऱ्या अधिकृत हवाई सर्वेक्षणास किंवा परवानगीने होणाऱ्या वापरास या आदेशातून सूट देण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

हा मनाई आदेश दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून २४ एप्रिल २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार असून, नागरिकांनी त्याचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button