मुले पळविणाऱ्या टोळीबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पालघर पोलीस दलाचे आवाहन

पालघर : जिल्ह्यात मुले पळविणाऱ्या टोळीबाबत समाजमाध्यमांवर व तोंडी पसरत असलेल्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन पालघर पोलीस दल यांनी केले आहे.

९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजता दांडी बस स्टॉप, ता. जि. पालघर येथे दांडी गावातील १३ वर्षीय दोन अल्पवयीन मुली बसची वाट पाहत असताना चादरी विक्रीसाठी आलेल्या काही इसमांनी त्यांच्या मोबाईलमध्ये मुलींचे फोटो काढले व त्यांचे ठावठिकाण आणि जाण्याच्या ठिकाणाबाबत विचारपूस केली. यामुळे संशय निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी संबंधित इसमांना ग्रामपंचायत दांडी येथे आणून चौकशी केली व तत्काळ पोलीसांना माहिती दिली. गावकऱ्यांनी कोणताही कायदा हातात न घेता संयम राखल्याचे पोलीसांनी नमूद केले आहे.

माहिती मिळताच सातपाटी पोलीस ठाणे तसेच बोईसर विभागातील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी दांडी गावातील तक्रारदाराच्या फिर्यादीवरून सातपाटी पोलीस ठाण्यात गु. र. नं. ०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७८ व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

पालघर जिल्ह्यात सन २०२५ मध्ये मुले/मुली पळवून नेल्याबाबत १९२ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी १८२ मुले/मुली सुरक्षितपणे मिळालेली आहेत. तपासात बहुतांश प्रकरणे अल्पवयीन प्रेमप्रकरणे किंवा घरगुती वादातून निघून गेल्याची असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणतीही संघटित बालअपहरण करणारी टोळी कार्यरत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद माहिती मिळाल्यास डायल ११२ किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. यतीश देशमुख यांनी केले आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button