पालघर : महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद व प्रा. डॉ. नवनाथ रासकर यांच्या सौजन्याने पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. किरण सावे यांना मानाचा ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ज्येष्ठ तत्त्वज्ञान-अभ्यासक डॉ. मोहनराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदच्या ४१व्या राज्यस्तरीय अधिवेशनात देण्यात आला.
हे अधिवेशन दि. ८ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी मुंबई विद्यापीठचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख, आयसीटी मुंबईचे कुलगुरू पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे डॉ. आनंद अभ्यंकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
शैक्षणिक क्षेत्रातील दीर्घकालीन योगदान, तत्त्वज्ञानातील सखोल व्यासंग, जिज्ञासू वृत्ती, संशोधनात्मक दृष्टिकोन, प्रभावी प्रशासकीय कामकाज आणि लेखनकार्य यांची दखल घेऊन डॉ. किरण सावे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, ग्रंथभेट व प्रमाणपत्र असे आहे.
डॉ. सावे यांनी प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळताना विद्यार्थीकेंद्री उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करणारे निर्णय आणि महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने शैक्षणिक व सहशैक्षणिक क्षेत्रात भरीव प्रगती साधली आहे.
विशेष म्हणजे, डॉ. किरण सावे यांना यापूर्वीही मुंबई विद्यापीठाचा ‘आदर्श प्राचार्य पुरस्कार’ प्राप्त झाला असून, सद्याचा सन्मान त्यांच्या कार्याची आणखी एक पावती ठरला आहे. या पुरस्काराबद्दल पालघर जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
