अभिनेते भाऊ कदम देणार पालघरच्या ग्रामपंचायतींना भेट

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विशेष दौरा

पालघर : 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या सक्षमीकरणासाठी सुप्रसिद्ध हास्यकलाकार, नाट्य व चित्रपट अभिनेते भाऊ कदम यांचा पालघर जिल्ह्यात नियोजित दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याअंतर्गत 13 जानेवारी रोजी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना भेट देऊन ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती निर्माण करणे तसेच ग्रामविकास प्रक्रियेत सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आपल्या खास शैलीतून सादरीकरण व थेट संवाद साधणार आहेत.

या दौऱ्यादरम्यान पालघर तालुक्यातील ग्रामपंचायत चहाडे, ग्रामपंचायत उमरोळी, डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायत घोलवड तसेच वाडा तालुक्यातील ग्रामपंचायत हमरापूर येथे भेटी देण्यात येणार आहेत. या ठिकाणी भाऊ कदम हे आपल्या विनोदी शैलीतून अनुभवाधारित मांडणी व संवादाच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील विविध उपक्रम, ग्रामपंचायतींची भूमिका, लोकसहभागाचे महत्त्व तसेच विकासकामांची माहिती प्रभावीपणे ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणार आहेत.

या भेटींमुळे ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळेल तसेच अभियानाबाबत जनजागृती वाढून ग्रामस्थांमध्ये विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन व सहभागाची भावना निर्माण होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

हा उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील यांच्या समन्वयातून राबविण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी-कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिला तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची माहिती घेऊन या जनजागृतीपर उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामविकास प्रक्रियेला गती मिळत असून, अशा संवादात्मक व जनजागृतीपर सादरीकरणांमुळे ग्रामपंचायती अधिक सक्षम व लोकाभिमुख होतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button