मनोर बिरसायत येथे रामनवमीच्या शुभमुहूर्तावर २६ जोडपी विवाहबद्ध : आनंद, परंपरा आणि एकतेचा भावस्पर्शी सोहळा

पालघर : मंगेश तावडे

मनोर येथील बिरसायत परिसर आज आनंद, उत्साह आणि भावनांच्या सागरात न्हाऊन निघाला होता. श्री राम नवमीच्या पावन मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात २६ जोडपी वैवाहिक जीवनाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करताना हजारो वऱ्हाडी आणि उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने आयुष्यभराच्या नात्यात बांधली गेली. आदिवासी एकता मित्र मंडळ व श्री राम मंदिर समिती, बिरसायत भवन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेला हा सोहळा केवळ विवाह नव्हता, तर सामाजिक एकता, संस्कृती आणि माणुसकीचा जिवंत उत्सव ठरला.

“जय गावतरी, जय कणसरी, जय धरतरी” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पारंपरिक वेशभूषेत सजलेले वधू-वर, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि कुटुंबीयांच्या डोळ्यातील समाधान पाहताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. प्रत्येक विधीमध्ये संस्कृतीची छाप आणि सामूहिकतेची ऊब जाणवत होती. साधेपणातही किती मोठेपण असते, याचा प्रत्यय या सोहळ्यातून पुन्हा एकदा आला.

दुपारी १२ वाजता राम जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर विवाह सोहळ्याला प्रारंभ झाला. स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज यांच्या कीर्तनातून वातावरण भक्तिमय झाले. त्यांच्या आशीर्वचनांनी उपस्थितांना आध्यात्मिक ऊर्जा मिळाली आणि नवदांपत्यांच्या आयुष्यासाठी मंगल कामना व्यक्त करण्यात आल्या.

प्रमुख पाहुणे म्हणून रघुनाथ कुलकर्णी सपत्नीक उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून विक्रमगडचे आमदार हरीश्चंद्र भोये, उद्योजक तुषारजी शिंघट, तसेच अन्य मान्यवरांनी उपस्थित राहून नवविवाहित जोडप्यांना शुभेच्छा दिल्या. “हा सोहळा केवळ विवाह नाही, तर २६ कुटुंबांच्या नव्या आयुष्याची खरी सुरुवात आहे,” असा भावनिक संदेश मान्यवरांनी यावेळी दिला.

या सामुदायिक विवाहामुळे अनेक कुटुंबांचा आर्थिक भार हलका झाला. अनावश्यक खर्च टाळून, साधेपणाने आणि समाजाच्या साक्षीने विवाह करण्याची ही परंपरा आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या उपक्रमामुळे केवळ दोन व्यक्ती नव्हे, तर दोन कुटुंबे आणि एक संपूर्ण समाज एकत्र येतो, ही भावना अधिक दृढ झाली.

सोहळ्याचे यजमान राघव सुरेखा उपेंद्र देशमुख, तसेच आयोजक संतोष आनंदी शिवराम जनाठे आणि संपूर्ण बिरसायत परिवार यांच्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. उपस्थितांनी आयोजकांचे मनापासून कौतुक केले.

वधू-वरांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, आशीर्वादासाठी पुढे सरसावलेले हात आणि एकमेकांच्या सुखात सहभागी होणारा समाज—या सर्वांनी हा दिवस खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरवला. हा सोहळा आदिवासी समाजाच्या एकजुटीचा, संस्कृतीप्रेमाचा आणि माणुसकीच्या नात्यांचा एक सुंदर उत्सव ठरला.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button