WCAWA आणि कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्या पुढाकारातून ‘Wildlife Ambulance-cum-Ranger Vehicle’ चे लोकार्पण
पालघर : पालघर जिल्ह्यात वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाला अधिक बळ देण्यासाठी WCAWA आणि कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीचा उपक्रम राबविण्यात आला. वाणगाव येथे आयोजित विशेष कार्यक्रमात अत्याधुनिक Wildlife Ambulance-cum-Ranger Vehicle चे लोकार्पण करण्यात आले. वन्यजीवांच्या बचाव, उपचार आणि संरक्षणासाठी हे वाहन महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पालघर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत बिबट्यासह विविध वन्यजीवांच्या हालचालींमध्ये वाढ झाली आहे. अनेक वेळा जखमी, आजारी किंवा मानवी वस्तीजवळ आलेल्या वन्यजीवांच्या बचावासाठी तातडीची यंत्रणा उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर अशा विशेष वाहनाची गरज प्रकर्षाने जाणवत होती.

या गरजेची दखल घेत कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी पुढाकार घेतला आणि वन्यजीव संरक्षणासाठी हे सुसज्ज वाहन उपलब्ध करून देण्यात आले. हे वाहन आधुनिक सुविधा आणि आवश्यक उपकरणांनी सुसज्ज असून जखमी वन्यजीवांना तातडीने उपचार केंद्रापर्यंत पोहोचविणे, बचाव मोहिमा राबविणे तसेच वनक्षेत्रातील आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.

वनविभाग, बचाव पथके आणि स्वयंसेवक यांना या वाहनामुळे अधिक वेगाने आणि प्रभावीपणे काम करता येणार असून मानव–वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेलाही मोठा हातभार लागणार आहे.कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना वन्यजीव संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व तसेच समुद्री कासव संरक्षणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच WCAWA सदस्यांना टी-शर्ट आणि प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास दिनेश विन्हेरकर, हार्दिक सोनी, एरिक तडवडा, पूर्वेश तांडेल, रोहन डी’क्रूझ, आचल मनियार, भावेश बाबरे, विशाल राऊत, अविनाश महाडिक, रेमंड डी’सूझा आणि पार्थ कंसारा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वन्यजीव संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करत पर्यावरण रक्षण आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व विशद केले. निसर्ग आणि वन्यजीवांप्रती संवेदनशीलता निर्माण करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी, वन्यजीव अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पालघर जिल्ह्यातील वन्यजीव संरक्षण चळवळीला नवी दिशा देणारा आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरणारा हा उपक्रम भविष्यात वन्यजीव संरक्षण व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

