विद्युत तारेचा स्पर्श; तिळसे येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू

महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार उघड

वाडा/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कथित दुर्लक्षामुळे वाडा तालुक्यातील तिळसे येथे एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तिळसे गावात राहणारे गणपत लक्ष्मण दळवी (वय ४३) हे सकाळच्या सुमारास कामासाठी वाडा येथे शेतातून पायवाटेने येत असताना खाली पडलेल्या विद्युत वाहक तारेचा स्पर्श झाल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. मात्र, तोपर्यंत दळवी यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वीज वितरणच्या कारभारविरोधात नागरिकांमध्ये संतापाची भावना उमटल्याचे पाहायला मिळाले.

  स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरातील विद्युत वाहक तारा व खांब हे जवळपास चाळीस वर्षांपूर्वीचे, जुने व गंजलेले आहेत. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असून अन्य जीवितास धोका निर्माण झाला आहे.

या घटनेनंतर नागरिकांनी जुन्या व धोकादायक विद्युत तारा आणि खांब तत्काळ काढून नवीन बसविण्याची जोरदार मागणी केली आहे. तसेच मृत गणपत दळवी यांच्या कुटुंबीयांना वीज वितरण कंपनीकडून तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button