शाळेच्या क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेल्या दहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

पालघर : प्रतिनिधी

तलासरी तालुक्यातील वेवजी येथील लोकभारती संस्थेच्या भारती अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. शाळेच्या क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेल्या दहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. रोशनी रमेश गोस्वामी (वय १५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

दिनांक ३ जानेवारी रोजी शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मॅरेथॉन स्पर्धेत रोशनीने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळवला. मात्र स्पर्धा संपल्यानंतर अवघ्या काही वेळातच तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले. छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने तिला तातडीने उपचारासाठी गुजरातमधील उंबरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे रोशनीचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे शाळा प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांमध्ये तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

गुणवंत, उत्साही आणि क्रीडापटू विद्यार्थिनी म्हणून ओळख असलेल्या रोशनीच्या अकाली निधनाने वेवजी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button