वसई विरार मनपा निवडणूकित भाजपकडून युतीधर्माला हरताळ

 7 अतिरिक्त एबी फॉर्म देऊन महायुतीत संभ्रम – आमदार विलास तरे यांचा आरोप

राजतंत्र वृत्तसेवा

पालघर (मंगेश तावडे) :  वसई विरार मनपा निवडणूकित बोईसर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या ठरलेल्या जागावाटपाच्या सूत्राला जाणीवपूर्वक तडा देत तब्बल 7 अतिरिक्त एबी फॉर्म वितरित केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे, असा थेट आणि सडेतोड आरोप शिवसेना आमदार विलास तरे यांनी केला आहे. हा प्रकार केवळ अनुशासनभंग नसून, महायुतीच्या एकात्मतेवर आघात करणारा आणि युती धर्माशी सरळ संभ्रम निर्माण करणारा आहे, असेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

भारतीय जनता पक्ष, शिवसेना, श्रमजीवी संघटना आणि आगरी सेना यांच्या माध्यमातून महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला असताना, त्यानुसार भाजपला 88 जागा आणि शिवसेनेला 27 जागा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आम्ही आमच्या पक्षातील अतिशय चांगल्या उमेदवारांना उमेदवारी देऊ शकलो नाही, त्याचप्रमाणे प्रभाग 1 मध्ये शिवसनेच्या कार्यकर्त्यांकडून 4 अपक्ष अर्ज दाखल केले असता, पक्षाच्या आदेशानुसार त्वरित 4 ही उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. हा निर्णय सर्व घटक पक्षांच्या संमतीने आणि महायुतीचा उद्देश चांगला जावा, जनतेसमोर एकसंध ताकद उभी राहावी या हेतूने घेण्यात आला होता. मात्र, या सर्व निर्णयांना हरताळ फासत भाजपकडील काही नेत्यांनी स्वार्थापोटी व अंतर्गत गटबाजीपोटी 7 अतिरिक्त एबी फॉर्म दिले, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी व न पटणारा आहे. या बेजबाबदार कृतीमुळे महायुतीच्या उमेदवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला असून, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. महायुतीचा पराभव व्हावा, अंतर्गत गोंधळ निर्माण व्हावा, या हेतूनेच हा डाव आखण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. ही बाब स्वतःच भाजपच्या अंतर्गत गैरव्यवस्थापनाची साक्ष देणारी आहे.

वसई-विरारमधील भाजप नेतृत्वाने या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ जबाबदारी स्वीकारावी, तसेच ज्यांनी युतीचा निर्णय धाब्यावर बसवून अतिरिक्त एबी फॉर्म दिले, त्या संबंधित व्यक्तींवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार विलास तरे यांनी केली आहे. महायुती म्हणजे कोणाच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा खेळ नसून, ती जनतेच्या विश्वासावर उभी असलेली व्यवस्था आहे. त्या विश्वासाशी खेळणाऱ्यांना माफी नाही, असा इशाराही त्यांनी दिला. महायुतीचा उद्देश राज्यात स्थिर, विकासाभिमुख व लोकाभिमुख शासन देण्याचा आहे. तो उद्देश उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांवर कारवाई झाली नाही, तर त्याच्या फटका महायुतीच्या उमेदवारांना त्या प्रभागात बसू शकतो, असेही आमदार विलास तरे यांनी ठामपणे स्पष्ट केले आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button