पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांच्या पाठपुराव्याला यश
पालघर / नवी दिल्ली : पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळत केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदल्यावरचा प्राप्तिकर (Income Tax) आणि टीडीएस (TDS) पूर्णपणे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ३० मार्च २०२६ रोजी परिपत्रक (Circular No. 01/2026) काढून या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे निर्देश दिले आहेत.
यापूर्वी ‘RFCTLARR Act, 2013’ अंतर्गत मिळणाऱ्या मोबदल्याला करमाफी असताना ‘राष्ट्रीय महामार्ग कायदा १९५६’ अंतर्गत मिळणाऱ्या मोबदल्यावर कर आकारला जात होता. या विसंगतीमुळे शेतकरी व भूधारकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून देत डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी २२ मार्च २०२६ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला.
नवीन आदेशानुसार, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांसाठी संपादित जमिनीच्या मोबदल्यावर आता कोणताही प्राप्तिकर लागणार नाही तसेच टीडीएस कापला जाणार नाही. ‘NHAI’, ‘NHIDCL’ आणि भूसंपादन अधिकाऱ्यांना याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे देशभरातील तसेच पालघर जिल्ह्यातील हजारो शेतकरी, भूधारक आणि प्रकल्पग्रस्तांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांचे आभार मानत, जनतेच्या हक्कासाठी लढा पुढेही सुरू राहील, असा विश्वास खासदार सवरा यांनी व्यक्त केला.
