वाडा | प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकी जपत खानिवली ग्रामपंचायतीने ज्येष्ठ विधवा महिलांसाठी ‘मायेचा शिधा’ हा अभिनव आणि स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. सन २०२६–२७ च्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून, चालू महिन्यापासून प्रत्यक्ष लाभार्थ्यांना शिधा वाटपाला सुरुवात झाली आहे.
या उपक्रमांतर्गत गावातील ज्येष्ठ विधवा महिलांना दर महिन्याला जीवनावश्यक वस्तूंचा संच दिला जाणार आहे. यामध्ये तांदूळ, डाळी, खाद्यतेल, साखर, चहा पावडर, तसेच कांदे, बटाटे आणि लसूण यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः ज्येष्ठ विधवा महिलांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी ग्रामपंचायतीने हा पुढाकार घेतला आहे. गावातील सर्व पात्र महिलांची नोंदणी करून त्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, ग्रामपंचायतीने लाभार्थी महिलांची आरोग्यदृष्ट्याही काळजी घेतली आहे. सर्व महिलांचे आयुष्मान भारत कार्ड तयार करण्यात आले असून, दर महिन्याला आरोग्य तपासणी करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ अन्नसुरक्षाच नव्हे, तर आरोग्यसुरक्षाही सुनिश्चित केली जात आहे.
ग्रामपंचायत स्तरावर असा उपक्रम राबविण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे खानिवली ग्रामपंचायतीने इतर गावांसमोर आदर्श निर्माण केला असून, विविध स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.
या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरपंच भरत हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच सागर पाटील, ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत ठाकरे, तसेच सदस्य आणि कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले आहेत. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, असे सरपंचांनी स्पष्ट केले.
