पालघर | प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या पालघर जिल्ह्यातील संघटनात्मक कामात गेली अनेक वर्षे सक्रिय असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते प्रशांत प्रभाकर पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. वसई–विरार महापालिकेत सत्तेत असलेल्या बहुजन विकास आघाडीचे नेते माजी आमदार हितेंद्र ठाकुर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रशांत पाटील यांनी गेल्या दहा वर्षांपासून भाजपमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच पद तसेच सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षासाठी झोकून देऊन काम केले असून अनेक ठिकाणी उमेदवारांच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
मात्र, पालघर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे तिकीट नाकारण्यात आल्यानंतर पक्षात त्यांची घुसमट वाढत गेली. केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रीय पक्षात अपेक्षित सन्मान न मिळाल्याने अखेर त्यांनी भाजपपासून फारकत घेतल्याचे बोलले जात आहे.
बहुजन विकास आघाडीत झालेल्या पक्षप्रवेशावेळी महापौरपदाचे उमेदवार आजीव पाटील, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हा बँक संचालक नागेश पाटील तसेच उमरोळीचे सरपंच प्रभाकर पाटील उपस्थित होते. प्रशांत पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
