वाडा नगर पंचायत उपनगराध्यक्षापदी मनिष देहेरकर यांची बिनविरोध निवड

स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिंदे सेनेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार विराज पाटील आश्चर्यकारकरित्या विजयी

वाडा / प्रतिनिधी : वाडा नगरपंचायतीच्या आज झालेल्या उपनगराध्यक्ष निवडणूकीत भाजपचे मनिष देहेरकर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून एकच जल्लोष केला. आज झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाजपकडून मनिष देहेरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर महाविकास आघाडीकडून सुचिता पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत सुचिता पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने देहेरकर यांची बिनविरोध निवड झाली.

या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष रिमा गंधे यांनी काम पाहिले. सतरा नगरसेवकांची संख्याबळ असलेल्या वाडा नगरपंचायतीत भाजपचे 11, शिवसेना शिंदे गट 3, तर शिवसेना उबाठा, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असे प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे भाजप करिता ही निवडणूक एकतर्फीच होणार होती. पंरतू महाविकास आघाडीचा उमेदवारी अर्ज माघारी गेल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

भाजपावर नामुष्की

वाडा नगरपंचायतीत स्वीकृत नगरसेवकांकरिता दोन पदे मंजूर होती. भाजपच्या गटाकडून एक स्वीकृत नगरसेवक बसत होता. त्या जागेवर भाजपचे माजी शहरप्रमुख हर्षल खांबेकर यांची नियुक्ती करण्यात आली तर दुस-या जागे करिता भाजपने शिंदे गटाच्या कोट्यातून भाजपा कार्यकर्ता शुभांगी उत्तेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडीच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिंदे गटाकडून दाखल केलेल्या शुभांगी उत्तेकर यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद ठरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे विराज पाटील विजयी झाले. पुरेसे संख्याबळ असतानाही उत्तेकरांचा अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरल्याने भाजपावर नामुष्की ओढावली आहे.

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

महाविकास आघाडी म्हणून नगरपंचायतीत अवघे तीन नगरसेवक निवडून आलेले असताना स्वीकृत नगरसेवक पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विराज पाटील हे विजयी झाल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत वाडा शहरातून मिरवणूक काढली. 

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button