अपघातग्रस्तांना तत्काळ मदतीसाठी पालघर पोलिसांचा पुढाकार “GOOD SAMARITAN” ॲपविषयी कार्यशाळा उत्साहात


पालघर : राजतंत्र वृत्तसेवा

रस्ते अपघातांमध्ये जखमींना तात्काळ मदत व प्रथमोपचार मिळावा यासाठी पालघर पोलीस दलातर्फे “GOOD SAMARITAN” अॅपविषयी जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दि. १२ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे हा उपक्रम पार पडला.


यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल व्हटकर, प्रभारी अधिकारी, जिल्हा वाहतूक शाखा, पालघर यांनी कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी Maharashtra Emergency Medical Services (MEMS) कंपनीचे डॉ. मंगेश चव्हाण, डॉ. लक्ष्मण जाधव, डॉ. अमित वाडे, डॉ. नवीन गिरी आणि डॉ. मनरक उपस्थित होते.

कार्यशाळेत अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार कसा द्यावा, गंभीर परिस्थितीत कोणती खबरदारी घ्यावी, तसेच त्वरित रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून वैद्यकीय उपचार मिळवून देण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “GOOD SAMARITAN” अॅपचा वापर करून अपघातस्थळी तत्काळ मदत कशी पोहोचवता येईल, याचे प्रात्यक्षिकही देण्यात आले.

यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदारांनी अॅप डाउनलोड करून त्याच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. कार्यशाळेस पोलीस अधीक्षक कार्यालयातील १०८ पोलीस अधिकारी व कर्मचारी, रस्ता अपघात नियंत्रण समितीचे सदस्य, MEMS टीम तसेच जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.

दरम्यान, जिल्ह्यातील विविध ठिकाणी वाहतूक शाखेमार्फत एलईडी स्क्रीनवर “GOOD SAMARITAN” अॅपची माहिती प्रसारित करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती वाढून अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळण्यास मोठी मदत होणार आहे. परिणामी, रस्ते अपघातांतील मृत्यूदर कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button