पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषदेने सुरू केलेले बेमुद्दत आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही कायम असून, मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्यातही आंदोलनकर्त्यांनी आपला लढा सुरू ठेवला आहे.
आदिवासींच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविणे, पेसा ग्रामपंचायतींना न्याय मिळवून देणे, बनावट एसटी प्रमाणपत्रधारकांवर कारवाई करणे, सार्वजनिक रस्त्यांवरील अडथळे दूर करणे तसेच गोठणपूर येथील वाघाया-गावदेव स्थळाच्या विटंबनेच्या प्रकरणात कठोर कारवाई करण्याच्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.
दरम्यान, बुधवारी पहाटे पालघरमध्ये झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा जोरदार फटका आंदोलनस्थळी बसला. उपोषणासाठी उभारण्यात आलेला मंडप अक्षरशः उखडून गेल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय झाली. पावसाचे पाणी मंडप परिसरात शिरल्याने साहित्याचे नुकसानही झाले. मात्र, या संकटामुळे आंदोलनकर्त्यांचा निर्धार डळमळीत झाला नाही.
“निसर्गाच्या संकटासमोर झुकणार नाही, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील,” असा ठाम इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. प्रशासनाने अद्याप मागण्यांबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने आदिवासी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.पावसाने मंडप उखडला, पण आंदोलनकर्त्यांचा लढाऊ बाणा उखडू शकला नाही. आता जिल्हा प्रशासन या गंभीर प्रश्नांवर कोणता निर्णय घेते आणि आंदोलनाला कसा प्रतिसाद देते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
