खानिवली–गोऱ्हे रस्त्यावरील खड्ड्यामुळे भीषण अपघात; उल्हास सावंत यांचा जागीच मृत्यू

वाडा : वाडा तालुक्यातील खानिवली– बोरांडा- गोऱ्हे फाटा मार्गावर आंबिस्ते बुद्रुक येथे मंगळवारी (२३ डिसेंबर) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास झालेल्या कार अपघातात उल्हास उदय सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खानिवलीहून आंबिस्ते खुर्द येथे घरी जात असताना त्यांच्या वाहनासमोरून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने रस्त्यावरील खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सावंत यांनी आपले वाहन बाजूला घेतले. 

मात्र वेग अधिक असल्याने वाहन थेट रस्त्याकडील झाडावर आदळले. धडकेनंतर वाहन पलटी झाले. या अपघातात उल्हास सावंत यांच्या छाती व मानेला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

खानिवली–गोऱ्हे रस्त्यावर मोठ्या अवजड वाहनांची रेलचेल होत आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अपघातांची मालिका रोखण्यासाठी रस्त्यावरील खड्डे तातडीने डांबरीकरण करून बुजवावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button