महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती
नवी दिल्ली :
देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी तसेच कोळंबी उत्पादनात लक्षणीय वाढ साध्य करण्याच्या उद्देशाने नवी दिल्ली येथे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री श्री. राजीव रंजन सिंह (ललन सिंह) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीस महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री श्री. नितेश राणे यांनी उपस्थित राहून महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय विकासाबाबत तसेच कोळंबी उत्पादकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सविस्तर मांडणी केली.

या बैठकीत एसपीएफ (SPF) कोळंबी ब्रूडस्टॉक, पीपीएल (Post Larvae) तसेच जिवंत खाद्य आयात यासंदर्भातील कायदेशीर, तांत्रिक व जैवसुरक्षेशी निगडित मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. कोळंबी उत्पादनात शाश्वत वाढ साध्य करताना कडक जैवसुरक्षा नियमांचे पालन, आयात प्रक्रियेतील अडथळे कमी करणे, तसेच भारतीय मत्स्यव्यवसायाला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजना यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्रातील कोळंबी उत्पादक, हॅचरी उद्योग, मत्स्य खाद्य व निर्यात क्षेत्रातील अडचणी मांडत मंत्री नितेश राणे यांनी राज्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याची गरज अधोरेखित केली.
महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात कोळंबी शेतीला मोठी संधी असून, आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार ब्रूडस्टॉक व सुलभ आयात धोरणांमुळे उत्पादन आणि रोजगारवाढ शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री श्री. प्रा. एस. पी. सिंग बघेल, भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच आयसीएआर (ICAR) संस्थांतील शास्त्रज्ञ, एमपीईडीए (MPEDA) आणि सीएए (CAA) चे प्रतिनिधी यांच्यासह कोळंबी शेती, हॅचरी, निर्यात व मत्स्य खाद्य क्षेत्रातील विविध भागधारकांनी सहभाग घेतला. बैठकीदरम्यान सर्व भागधारकांनी मत्स्यव्यवसायाच्या शाश्वत, सुरक्षित व निर्याताभिमुख विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
