केळवे माहिम येथील श्री सूर्यनारायण मंदिराचा १२१ वा जन्मोत्सव होणार उत्साहात साजरा

भाविकांसाठी अविस्मरणीय ठरणार हिंदी ‘सारेगम लिटिल चॅम्प्स’ विजेती ज्ञानेश्वरी गाडगे हिच्या भक्तिसंगीताची सेवा

केळवे माहिम (पालघर) :

केळवे माहिम येथील प्राचीन व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सूर्यनारायण मंदिराचा १२१ वा जन्मोत्सव येत्या शनिवार, २४ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजल्यापासून ते सोमवार, २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे.

श्रीमत सद्गुरू पद्मनाभाचार्य पदप्रणीत श्री सूर्यनारायण मंदिराचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षी अव्याहतपणे व अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. गेल्याच वर्षी या मंदिराचा दशकपूर्ती सोहळा संपन्न झाला असून, त्या सोहळ्याला महाराष्ट्रासह विविध राज्यांतून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यंदाच्या जन्मोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे कु. ज्ञानेश्वरी गाडगे (हिंदी ‘सारेगम लिटिल चॅम्प्स’ विजेती) हिच्या भक्तिसंगीताची सेवा, जी भाविकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

या जन्मोत्सव सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे अभिषेक, आरती, सुदर्शन स्तोत्र पठण, हरिपाठ, सांप्रदायिक प्रवचने, तसेच महाराष्ट्र, गुजरात व गोवा येथील विविध भजनी मंडळांची सुश्राव्य भजने. या शिवाय वारकरी कीर्तन, महिलांचे वारकरी कीर्तन, तसेच बालगोपाळांचे संतांवर आधारित नाट्यमय सादरीकरण भाविकांना अनुभवता येणार आहे. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जन्माचे कीर्तन होऊन त्यानंतर अत्यंत देखणा पालखी सोहळा संपन्न होणार आहे.

भारतीय संस्कृतीत ३३ कोटी देव मानले गेले असले, तरी प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणारा एकमेव देव म्हणजे श्री सूर्यनारायण असल्याची भावना व्यक्त केली जाते. संपूर्ण ब्रह्मांडात सूर्याचे स्थान मध्यवर्ती असून पृथ्वीवरील संपूर्ण जनजीवन सूर्यनारायणाच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. असे असूनही भारतात सूर्यनारायणाची मंदिरे तुलनेने कमी ठिकाणी आढळतात. गुजरात, तामिळनाडू, काश्मीर, अरुणाचल प्रदेश व महाराष्ट्रात काही सूर्यमंदिरे असून, महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी येथील कणकादित्य मंदिर प्रसिद्ध आहे. त्याच परंपरेत पालघर जिल्ह्यातील केळवे माहिम येथील श्री सूर्यनारायण मंदिर विशेष महत्त्वाचे मानले जाते.

या पार्श्वभूमीवर श्री सूर्यनारायण सेवा संघाच्या वतीने सर्व भाविकांना या १२१ व्या जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “आपल्या आयुष्यात एकदातरी प्रत्येकाने आवर्जून अनुभवावा असा हा अविस्मरणीय सोहळा आहे,” असे आयोजकांकडून सांगण्यात आले. भाविकांना सूर्यनारायणाच्या इतर मंदिरांची माहिती आयोजकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. संपर्क : हर्षाली लोखंडे-मुकणे (मो. ९६९९१०१५२०)

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button