पालघरमध्ये वनराई व आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचा गौरव सोहळा; गणेश नाईक यांचे संवेदनशील प्रशासनावर भर

पालघर, दि. ३० मार्च : राजतंत्र वृत्तसेवा

पालघर जिल्ह्यातील ग्रामविकास आणि जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती, ग्रामसेवक व अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद पालघरच्या जननायक बिरसा मुंडा सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी आमदार राजेंद्र गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

वनराई उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतींना किमान पाच बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ३८ ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. चहाडे ग्रामपंचायतीने १५ बंधारे उभारून प्रथम क्रमांक पटकावला, तर भाताणे, आडणे व बऱ्हाणपूर ग्रामपंचायतींनी प्रत्येकी १२ बंधारे उभारून उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. यासोबतच सन २०२२-२३ व २०२३-२४ मधील आदर्श ग्रामसेवक तसेच सन २०२४-२५ मधील आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. प्रलंबित पुरस्कारांचे वितरण झाल्याने सन्मानितांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

आपल्या भाषणात पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांप्रती संवेदनशील राहून काम करावे, असे सांगितले. “जात, धर्म किंवा पक्षभेद न करता प्रत्येक नागरिकापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत,” असे ते म्हणाले. वनराईसारख्या उपक्रमांमुळे जलसंधारणाला चालना मिळून ग्रामीण विकास अधिक सक्षम होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार राजेंद्र गावित यांनी ग्रामविकासासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी शाश्वत विकासासाठी सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी वनराई उपक्रमात १००० बंधाऱ्यांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ११२८ बंधारे उभारण्यात आल्याची माहिती दिली. तसेच ‘निपुण पालघर’ उपक्रमाचा आढावाही त्यांनी सादर केला.

कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांचा सेवानिवृत्ती निमित्त गणेश नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांचाही यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद यांनी मानले. मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button