“विकलांगता मुक्त पालघर” अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो रुग्णांची तज्ज्ञांकडून तपासणी
पालघर : विष्णू सवरा सामाजिक न्यास, इन्स्टिट्यूट ऑफ पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक डिसऑर्डर्स, मुंबई आणि मुस्कान चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विकलांगता मुक्त पालघर अभियान’ उपजिल्हा रुग्णालय, पालघर येथे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा (एमबीबीएस, एमएस ऑर्थो) यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडले. या शिबिराला जिल्ह्याच्या विविध भागांतून शेकडो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

शिबिरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तरल नागदा आणि डॉ. जयदिप धमेले यांनी आपल्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकासह प्रत्येक रुग्णाची सखोल तपासणी करून आवश्यक उपचार, शस्त्रक्रिया आणि पुनर्वसनाबाबत मार्गदर्शन केले. अनेक रुग्णांना पुढील उपचारांसाठी आवश्यक सल्लाही देण्यात आला.

यावेळी बोलताना सामाजिक कार्याची प्रेरणा देणाऱ्या दिवंगत विष्णू सवरा यांच्या सेवाभावी परंपरेचा उल्लेख करण्यात आला. संघटित कार्यपद्धती, सेवाभाव आणि टीमवर्कच्या बळावर समाजातील वंचित आणि दिव्यांग घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सांगितले. समाजातील दिव्यांग व्यक्तींना केवळ वैद्यकीय उपचार नव्हे, तर सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हीच या अभियानामागील भूमिका असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

शिबिरासाठी आलेल्या सर्व रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी विष्णू सवरा सामाजिक न्यासतर्फे नाश्ता, पिण्याचे पाणी आणि भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

या कार्यक्रमाला जयश्री विष्णू सवरा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, डॉ. लोहारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष भरत रजपूत, पालघर नगराध्यक्ष उत्तम घरत, वाडा नगराध्यक्ष रिमा गंधे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोले, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रकाश निकम, पूर्व मंडळ अध्यक्ष हर्षद पाटील, माजी उपाध्यक्ष पंकज कोरे, भाजप शहराध्यक्ष ॲड. जयेश आव्हाड, भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास म्हात्रे, नगरसेवक भावानंद संखे, नगरसेवक अमिष पिंपळे, नगरसेवक राहुल पाटील, माजी नगरसेवक अरुण माने, अशोक अंबुरे, तेजराज हजारी, गणेश कुडू , हेमंत पाटील, सविता मल्लाह, नगरसेविका यांच्यासह अनेक मान्यवर, रुग्ण आणि नागरिक उपस्थित होते.

आरोग्यसेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा प्रभावी संगम ठरलेल्या या अभियानामुळे दिव्यांग नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला आणि उपचारांची दिशा मिळाल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

