प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त आमगावात ९५ गरोदर मातांची आरोग्य तपासणी

तलासरी : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA) च्या दशकपूर्तीनिमित्त पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील आमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष गरोदर माता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ९५ गरोदर मातांची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून सुरक्षित मातृत्वासाठी आवश्यक मार्गदर्शन व उपचार उपलब्ध करून देण्यात आले.

शिबिरादरम्यान गरोदर महिलांची रक्तदाब, वजन, हिमोग्लोबिन, लघवी तसेच इतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. उपस्थित सर्व महिलांची स्त्रीरोगतज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. यामध्ये ३१ अति जोखीम (हाय रिस्क प्रेग्नन्सी) असलेल्या गरोदर मातांची ओळख पटवून त्यांच्यासाठी विशेष वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि आवश्यक औषधोपचार तातडीने सुरू करण्यात आले.

आरोग्य तपासणीबरोबरच गरोदर महिलांना संतुलित व पोषक आहाराचे महत्त्व, मातृ व बाल आरोग्याची योग्य काळजी, तसेच गर्भधारणेदरम्यान उपयुक्त ठरणारी योगासने आणि प्राणायाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महिलांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे आणि गर्भाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी या उद्देशाने गर्भसंस्कार शिबिराचेही आयोजन करण्यात आले. सकारात्मक विचारसरणी आणि निरोगी जीवनशैलीचा आई व बाळाच्या आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली.

हे विशेष आरोग्य शिबिर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमृता भाकरे यांच्या देखरेखीखाली आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे गरोदर महिलांना वेळेवर आरोग्य तपासणी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आवश्यक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध झाले. अति जोखीम असलेल्या गर्भवतींची वेळेत ओळख झाल्याने संभाव्य गुंतागुंत टाळण्यास मदत होणार असून सुरक्षित मातृत्व आणि निरोगी बालकांच्या जन्मासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button