पालघर :
आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या पालघर येथील शाळेत लायन्स क्लबच्या वतीने शिक्षकांसाठी ‘टीचर्स ओरिएंटेशन प्रोग्राम’ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आर्यन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष केदार काळे यांनी वाढत्या अनधिकृत शाळांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत शासनाने अशा शाळांची अधिकृत यादी जाहीर करून त्यांच्या परिसरात “ही अनधिकृत शाळा आहे” असे फलक लावावेत तसेच संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली.
आपल्या भाषणात ते म्हणाले की, अनधिकृत शाळा विद्यार्थी आणि पालकांच्या भवितव्याशी खेळत आहेत. त्यामुळे केवळ प्रशासकीय कारवाई न करता कठोर फौजदारी कारवाई केल्यासच अशा शाळांना आळा बसेल. पालकांनीही प्रवेश घेताना शाळेची अधिकृत मान्यता तपासूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांचे अध्यापन कौशल्य आणि विद्यार्थ्यांशी संवाद अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने हा ओरिएंटेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लायन क्वेस्ट आणि ग्लोबल लीडरशिप टीम (GLT) यांच्या अंतर्गत हा उपक्रम पार पडला. कार्यक्रमात शिक्षकांना आधुनिक अध्यापन पद्धती, कौशल्य विकास, किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्यांचे समुपदेशन तसेच नेतृत्वगुण विकसित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पुण्याहून आलेले लायन्स क्लबचे जोशी व नितीन यांनी मार्गदर्शन केले, तर पालघर लायन्स क्लबच्या सौ. दांडेकर यांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव जैन दांडेकर, स्कूल कमिटीचे अध्यक्ष कमलेश वारया, प्रा. घुगे, किरण पाटील, मुख्याध्यापिका सोनार, शिंदे, तन्ना तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
