दांडेकर महाविद्यालयात उडान महोत्सव 

अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा.: डॉ. बळीराम गायकवाड

पालघर : 

‘अभ्यासक्रमापलीकडे जाऊन आपण जीवनाचा अर्थ शोधला पाहिजे. जीवनाचा अनुभव घेतला पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आपण बाहेर पडतो तेव्हा बऱ्याच गोष्टी विसरल्या जातात पण एक गोष्ट आपण विसरत नाही ती म्हणजे अनुभव! आणि हा अनुभव देण्याचे काम आजीवन शिक्षण व विस्तार विभाग करीत आहे’ असे प्रतिपादन प्रा. डॉ. बळीराम गायकवाड यांनी ‘उडान: द फ्लाईट ऑफ एक्सटेन्शन २०२६’ या वार्षिक महोत्सवाप्रसंगी संवाद साधताना केले.

मुंबई विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण व विस्तार विभाग व सोनोपंत दांडेकर कला, वा. श्री. आपटे वाणिज्य व एम.एच. मेहता विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक “उडान – द फ्लॉईट ऑफ एक्सटेन्शन 2026” या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी डॉ. बळीराम गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

संस्थेचे कोषाध्यक्ष मंगेश पंडित यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवित स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी ‘आजीवन शिक्षण जे आयुष्यभर चालू असते, जे समाजाशी नाळ जोडते. केवळ परीक्षेतील गुण आपण आयुष्यात काय बनणार आहेत हे ठरवू शकत नाही. आपली स्वप्न आपणच जपली पाहिजेत त्यासाठी विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पाहिजे’ अशी आग्रही भूमिका मांडली. 

या महोत्सवात पथनाट्य, पोस्टर मेकिंग, पोवाडा, सर्जनशील लेखन व वकृत्व या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण बावीस महाविद्यालये व ३५० स्पर्धक सहभागी झाले होते. या महोत्सवात वकृत्व व पोस्टर स्पर्धेत प्रथम तर पथनाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवीत सोनोपंत दांडेकर महाविद्यालय दोन सुवर्णपदके व एक कांस्य पदकाचे मानकरी ठरले.

याप्रसंगी डॉ. कुणाल जाधव, उपप्राचार्य डॉ. तानाजी पोळ व डॉ. महेश देशमुख तसेच विविध महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत मोगले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दर्शना चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. दक्षता पाटील व डॉ. वैभवा मोरे यांनी केले. 

सदर आंतरमहाविद्यालयीन महोत्सव यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी डॉ. प्रशांत मोगले, डॉ. दक्षता पाटील डॉ. दर्शना चौधरी डॉ. वैभवा मोरे, डॉ. पूजा केणी व प्रा. रुद्राक्षी राऊत त्यांनी विशेष मेहनत घेतली. प्राचार्य डॉ. किरण सावे, उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख व डॉ. तानाजी पोळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button