पालघर : राजतंत्र वृत्तसेवा
पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप अकाउंट तयार करून एका युवकाची ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना पालघर सायबर पोलिसांनी झारखंड राज्यातून अटक केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील फसवणुकीची १०० टक्के म्हणजेच ५० हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मे २०२६ रोजी सायंकाळी ४.४९ ते ६.३८ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी विनीतकुमार मंशीलाल मीणा (वय २८, रा. वागुळसार, पालघर पश्चिम) हे घरी असताना त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एका अज्ञात व्यक्तीकडून संदेश आला. संबंधिताने आपल्या व्हॉट्सअॅप प्रोफाइलवर पालघरच्या जिल्हाधिकारी इंदु राणी जाखड यांचा फोटो लावून स्वतःची ओळख जिल्हाधिकारी म्हणून करून दिली आणि विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपीने एका बँक खात्यावर तातडीने ५० हजार रुपये पाठविण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी संबंधित खात्यावर रक्कम वर्ग केली. मात्र त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी पालघर सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१९ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ (सी) आणि ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक विश्लेषण, बँक व्यवहारांची पडताळणी आणि डिजिटल तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. त्यानुसार बलवंतकुमार कमलप्रसाद मंडल (वय २६) आणि राजुकुमार दुखन रवानी (वय २२), दोघेही धनबाद (झारखंड) येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी धनबाद येथे जाऊन दोघांना अटक केली आणि गुन्ह्यातील संपूर्ण ५० हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली.
या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा सायबर पोलीस स्टेशनचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे प्रदीप पाटील करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
