कोकण विभागाला सक्षम नेतृत्व; रुबल अग्रवाल यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

नवी मुंबई, दि. १ (विमाका) : कोकण विभागाच्या प्रशासनाला नवे बळ मिळाले असून अनुभवी आणि धडाडीच्या आयएएस अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी ३० मार्च २०२६ रोजी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रभारी आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारत कामकाजाची सुरुवात केली. २००८ बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या रुबल अग्रवाल यांनी आपल्या सेवाकाळात विविध महत्त्वाच्या पदांवर प्रभावी कामगिरी करत स्वतंत्र ठसा उमटवला आहे. सोलापूर येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तसेच अहमदनगर आणि जळगाव जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदाऱ्या पार पाडल्या.

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या त्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी ठरल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव अत्यंत नियोजनबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पडला. पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी कोविड-१९ संकटाचा प्रभावी मुकाबला केला. या कार्याची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. तसेच, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) आयुक्त म्हणून त्यांनी राज्यातील सुमारे १.१० लाख अंगणवाड्यांचे व्यवस्थापन सक्षमपणे सांभाळले.

कोकण विभागात येण्यापूर्वी त्या महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होत्या.त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार (२०१६-१७), महात्मा गांधी शांतता पुरस्कार, अरुण बोंगीरवार सार्वजनिक सेवा उत्कृष्टता पुरस्कार तसेच स्मार्ट सिटी ई-गव्हर्नन्स पुरस्कारांसह अनेक मानाचे सन्मान मिळाले आहेत.

भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कोकण विभागात महसूल प्रशासन, पायाभूत सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विभागातील कामकाजाचा आढावा घेत जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button