मंगेश तावडे : पालघर
पालघर शहरात आज सकाळचे दृश्य मनाला चटका देणारे होते. शहरातील एका गॅस एजन्सीसमोर शेकडो गरीब मजूर, ज्यांचे आयुष्य अक्षरशः हातावर पोट असणारे, भल्या पहाटेपासून ५ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लावून होते. त्यांच्या डोळ्यांत आशा होती, पण चेहऱ्यावर उपासमारीची भीती स्पष्ट दिसत होती. कारण एकच होते, आज सिलिंडर मिळाला नाही, तर घरची चूल पेटणार नाही.

हे सर्व मजूर गेल्या अनेक दिवसांपासून ५ किलोच्या सिलिंडरच्या प्रतीक्षेत आहेत. घरात लहान मुले, वृद्ध आई-वडील आणि दोन वेळच्या जेवणासाठी झगडणारे कुटुंब… या साऱ्यांचा भार त्यांच्या खांद्यावर आहे. अशीच कुणकुण लागली की एजन्सीमध्ये आज ५ किलोचे सिलिंडर उपलब्ध होणार आहेत, आणि मग काय—पहाटेच्या अंधारातच लोकांनी एजन्सीसमोर गर्दी केली. काहींनी तर रात्रभर जागून आपला नंबर लागावा म्हणून थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे रिकामी सिलिंडर HP चे होते.










दरम्यान, १५ किलोचे सिलिंडर बुकिंगनुसार नियमित मिळत असल्याचे सांगितले जात असले, तरी वास्तव चित्र वेगळेच आहे. अनेक ग्राहकांनी १५ ते २० दिवसांपूर्वी सिलिंडर बुक केलेले असूनही त्यांना अजूनपर्यंत सिलिंडर मिळालेला नाही. उलट, काही जणांना फक्त ८ दिवसांतच सिलिंडर मिळाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यामुळे “पहिले बुक करणाऱ्यांनी नेमकी काय चूक केली?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.एजन्सी प्रशासनाकडे या विस्कळीत व्यवस्थेचे कोणतेही ठोस उत्तर नाही. ग्राहकांच्या प्रश्नांना टाळाटाळ, अस्पष्ट कारणे आणि निष्क्रियता, यामुळे लोकांचा रोष आणखी वाढत आहे. गरीब मजुरांच्या आयुष्याशी असा खेळ सुरू असताना प्रशासन मात्र मौन बाळगून आहे, ही बाब अधिक वेदनादायक ठरत आहे.
आज ५ किलोच्या सिलिंडरसाठी झगडणाऱ्या या लोकांची अवस्था केवळ एक दिवसाची नाही, तर व्यवस्थेतील ढिसाळपणाचे जिवंत उदाहरण आहे. जे लोक रोज कष्ट करून दोन वेळचे अन्न कमावतात, त्यांनाच अशा मूलभूत गरजांसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागते, ही समाजासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.
जर तातडीने योग्य उपाययोजना करण्यात आली नाही, तर हीच रांग उद्या संतापाच्या ज्वालांत परिवर्तित होऊ शकते. गरीबांच्या चुली पेटल्या नाहीत, तर त्यांच्या मनातील आग मात्र नक्कीच पेटेल आणि त्याचे परिणाम भोगावे लागतील ते प्रशासनालाच.
