वांद्रे–उधना विशेष रेल्वे आता दररोज धावणार

खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

पालघर : 

पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे वांद्रे–उधना विशेष रेल्वे सेवा आता दररोज धावणार आहे.

०९०५५–५६ क्रमांकाची ही रेल्वे यापूर्वी आठवड्यातून केवळ पाच दिवसच धावत असल्याने गुरुवार व शुक्रवार या दोन दिवस प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती.

बोर्डी रोड, घोलवड, डहाणू रोड, वाणगाव, केळवे रोड, उमरोली, सफाळे व वैतरणा या स्थानकांवरील कर्मचारी, कामगार, व्यापारी, विद्यार्थी तसेच दैनंदिन अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षितता व प्रवासाच्या दृष्टीने मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही गंभीर बाब लक्षात घेऊन खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी १३ जानेवारी २०२५ पासून रेल्वे प्रशासन व केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच हा विषय संसदेत प्रभावीपणे मांडण्यात आला होता.

दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी डीआरएम मुंबई यांच्याकडेही हा प्रश्न ठोसपणे मांडल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत गुरुवार व शुक्रवार या दिवसांसाठी नवीन विशेष रेल्वे गाड्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे वांद्रे–उधना मार्गावरील रेल्वे सेवा प्रत्यक्षात दैनिक स्वरूपात सुरू होणार आहे.

विद्यमान रेल्वे सेवा :

• ०९०५५ – वांद्रे ते उधना (रविवार ते गुरुवार)

• ०९०५६ – उधना ते वांद्रे (शनिवार ते बुधवार)

नवीन घोषित रेल्वे सेवा :

• ०९०३५ – वांद्रे ते उधना (शुक्रवार, शनिवार)

• ०९०३६ – उधना ते वांद्रे (गुरुवार, शुक्रवार)

या निर्णयामुळे विरार ते वलसाड दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो कर्मचारी, कामगार, व्यापारी व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवाशांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण आहे.

याशिवाय, सुट्टी विशेष तसेच नव्याने सुरू होणाऱ्या रेल्वे गाड्यांना पालघर जिल्ह्यातील स्थानकांवर थांबे देण्यात यावेत, अशी मागणीही खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केली होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत वांद्रे–भिवाणी सुट्टी विशेष रेल्वेला पालघर स्थानकात थांबा मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, डहाणू उपनगरीय रेल्वे सेवा अधिक सक्षम व विस्तारित करण्यासाठी खासदार डॉ. हेमंत सवरा यांचे प्रयत्न सुरू असून भविष्यात प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, अशी माहिती देण्यात आली.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button