दांडेकर महाविद्यालयात ‘बोली जागर’ उत्साहात संपन्न

पालघर :

महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या विविध बोली भाषांचे जतन, संवर्धन व संरक्षण व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ अंतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यांत विद्यापीठे व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने ‘बोलींचा जागर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यातील ‘बोलींचा जागर’ सोहळा सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडी, शोभायात्रा आणि लेझीम सादरीकरणाने करण्यात आली. “बोली जगवा, बोली वाचवा, भाषा वाचवा, संस्कृती टिकवा” हे ब्रीद घेऊन या कार्यक्रमात बोली भाषांच्या जतन-संवर्धनावर सखोल विचारमंथन झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी, भाषा टिकवायची असेल तर शासनाची ठोस इच्छाशक्ती आवश्यक असून समाजघटकांनीही आपल्या भाषेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन केले.

बोली अभ्यासक डॉ. अंजली मस्करेन्हस यांनी बोलींच्या स्वरूपावर तसेच बोलीतून करता येणाऱ्या संशोधनाच्या संधींवर प्रकाश टाकला. डहाणू परिसरातील लोकसाहित्य आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे कार्य आपल्या अभ्यासातून झाल्याचे त्यांनी नमूद केले.

बोली अभ्यासक विवेक कुडू यांनी भाषातज्ज्ञांचे संदर्भ देत बोली संहाराबाबत चिंता व्यक्त केली. बोली संवर्धनाच्या विविध शक्यता त्यांनी मांडल्या. तसेच मागेल्यांच्या सामुद्रिक भाषिक ज्ञानाची माहिती देताना माशांची व जाळ्यांची वैविध्यपूर्ण नावे उपस्थितांना परिचित करून दिली.

सांस्कृतिक सादरीकरणात महेंद्र हाडळ यांनी मल्हार कोळी बोलीतील ‘आगोठीची तयारी’ सादर करत बोलीतील गोडवा आणि तिचे जीवनाशी असलेले नाते उलगडले. “मी जिथे शेतात, रानात, बांधावर जातो तिथे मला माझी बोली दिसते. नितळ ओढ्याचं पाणी जसं गोड लागतं, तशीच माझी बोली आहे; ती जिवापाड जपली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

अमोल नाईक यांनी मांगेला बोलीतील ‘जार गेला’ ही कथा सादर करत वसई परिसरातील अनेक दुर्मिळ शब्द श्रोत्यांसमोर आणले.

धुकटण गावातील रमेश डोवला व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेला आदिवासी घोर नाच (टिपरी नाच) हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. शशिकला पोतनीस महाविद्यालय, डहाणू येथील विद्यार्थिनींनी आदिवासी लोकगीते सादर केली. विष्णू हेमाडा यांनी मल्हार कोळी बोलीतून अनुभव कथन केले, तर हर्षल पागधरे यांनी कोळीनृत्य सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.

महाराष्ट्र शासनाची या उपक्रमाबाबतची भूमिका अनुवादक प्रज्ञा भोसले यांनी स्पष्ट केली. यावेळी अस्मिता शिरगावकर (सहाय्यक भाषा संचालक), गायत्री नरसाळे, रत्नमाला देवकते आदी मान्यवर शासन प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दर्शना चौधरी यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. यादव मोरे, प्रा. निलेश पाटील, सुवर्णा मंजुळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास रमाकांत पाटील, डॉ. मीनाक्षी सामंत, डॉ. रोमीयो मस्करेन्हस, भावना पाटील, श्रद्धा पाटील, तुळशीदास तांडेल, विजय ठाकूर, कुंदन पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button