17 जानेवारी रोजी होणाऱ्या दीक्षांत समारंभात होणार वितरण
पालघर : सोनोपंत दांडेकर कला, व्ही. एस. आपटे वाणिज्य व एम. एच. मेहता विज्ञान महाविद्यालय, पालघर येथील विद्यार्थिनी कु. अनुश्री दमणकर हिने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभ २०२५ मध्ये गणित विषयात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तिला दोन मानाच्या सुवर्णपदकांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये “वृंदा प्रभू सुवर्णपदक” तसेच “कै. सुमनबाई मुरलीधर भामरे सुवर्णपदक” यांचा समावेश आहे.

मुंबई विद्यापीठाचा हा दीक्षांत समारंभ शनिवार, दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता फोर्ट, मुंबई येथील सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. या समारंभात मान्यवरांच्या हस्ते कु. अनुश्री दमणकर यांना ही सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत.
अनुश्री हिने सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास, विषयावरील सखोल समज आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळविले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे दांडेकर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून इतर विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे.
या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी सांगितले की, यापूर्वी अर्थशास्त्र, भूगोल, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, तत्वज्ञान अशा विविध विषयांमध्ये दांडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकावली आहेत. त्या यशस्वी परंपरेत अनुश्री दमणकर हिने आपल्या गुणवत्तेने भर घातली आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सी. ए. सचिन कोरे, प्राचार्य डॉ. किरण सावे, उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख, उपप्राचार्य प्रा. डॉ. तानाजी पोळ, गणित विभागप्रमुख प्रा. दिपाली माळी, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थीवर्ग यांनी अनुश्रीचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
