जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांची नवीन वर्षाची सुरुवात आदिवासी विद्यार्थ्यांसोबत

पालघर : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी नवीन वर्षाची सुरुवात आदिवासी विद्यार्थ्यांसोबत करत शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संदेश दिला. इयत्ता १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष क्रॅश कोर्सला भेट देत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार येथील प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, पळसुंदे ता. मोखाडा, येथे हा क्रॅश कोर्स आयोजित करण्यात आला असून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि त्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या क्रॅश कोर्समध्ये शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दाभेरी, देहरे, विनवळ, न्याहाळे तसेच इतर सहा आश्रमशाळांमधील इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील एकूण ३५० विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. विद्यार्थ्यांना सखोल अभ्यास, विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक तयारीची संधी येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी या क्रॅश कोर्सचा जास्तीत जास्त लाभ घेऊन बारावी परीक्षेत गुणवत्ता वाढवण्यासाठी सातत्याने अभ्यास करण्याचे आवाहन केले. हा उपक्रम पुढील शैक्षणिक वर्षांत अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असून त्यामुळे आदिवासी भागातून अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी घडतील, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला. तसेच नीट (NEET) परीक्षेसाठी विशेष कोचिंगची गरज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर थर्टी’ बॅच सुरू करून स्वतंत्र मार्गदर्शन देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले. या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आतापासूनच लक्ष्य निश्चित करून अभ्यासाला लागावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

या उपक्रमाचे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि चिकाटीवर अवलंबून असून अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी अत्यंत आवश्यक आहेत, असे प्रेरणादायी प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केले

नवीन वर्षामध्ये पालघर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रामध्ये यशस्वी होणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button