रोटरीचा ‘पिंक ऑटो’ उपक्रम : महिलांच्या स्वावलंबनाला नवी गती


मुंबई-पालघरमध्ये 1,000 पिंक ऑटो रिक्षा धावणार; महिलांसाठी रोजगाराची मोठी संधी

मुंबई / पालघर : राजतंत्र वृत्तसेवा
महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक ठोस आणि प्रेरणादायी पाऊल उचलत रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 तर्फे मुंबई आणि पालघर जिल्ह्यात लवकरच 1,000 ‘पिंक ऑटो रिक्षा’ रस्त्यावर धावणार आहेत. या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे 1,000 महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळणार असून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास प्राप्त होणार आहे.


या उपक्रमाची औपचारिक सुरुवात मुंबईतील मुलुंड येथे 10 पिंक ऑटो रिक्षांच्या वाटपाने करण्यात आली. हा सोहळा रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष फ्रान्सिसको अरेझु आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. मनीष मोटवानी यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी रोटरीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिलांना संपूर्ण सहकार्य
‘रोटरी पिंक ऑटो’ प्रकल्प केवळ वाहन वाटपापुरता मर्यादित नसून, महिलांना संपूर्ण प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य देणारा सर्वसमावेशक उपक्रम आहे. या योजनेअंतर्गत महिलांनामोफत ऑटो रिक्षा ड्रायव्हिंग प्रशिक्षण, लायसन्स, बिल्ला आणि परमिट मिळवण्यासाठी मार्गदर्शन, सवलतीच्या दरात ऑटो रिक्षा, कर्ज मिळवण्यासाठी विशेष सहाय्य, तसेच डाउन पेमेंटची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे महिलांना कोणत्याही अडचणीशिवाय रोजगार सुरू करता येणार असून सुरक्षित आणि सन्मानजनक उदरनिर्वाहाचा मार्ग मोकळा होणार आहे.


पात्रता निकष निश्चित
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये
किमान 7 वी उत्तीर्ण, महाराष्ट्रात किमान 15 वर्ष वास्तव्य, आधार कार्ड व पॅन कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेत खाते, तसेच कोणताही पोलीस रेकॉर्ड नसणे (घरगुती किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे) या अटींचा समावेश आहे. स्वाभिमान, सुरक्षितता आणि स्वावलंबनाची ओळख ‘पिंक ऑटो’ हा उपक्रम केवळ वाहतुकीचा भाग नसून तो महिलांच्या स्वाभिमानाचा, सुरक्षिततेचा आणि स्वावलंबनाचा प्रतीक ठरत आहे. सार्वजनिक वाहतुकीत महिलांची उपस्थिती वाढल्याने महिला प्रवाशांनाही सुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे.


महिलांसाठी विशेष आवाहन
या उपक्रमाबाबत माहिती देताना रोटरीचे जिल्हा मुख्य समन्वयक भगवान पाटील यांनी सांगितले की, जर कोणतीही महिला स्वतःच्या पायावर उभी राहण्याची इच्छा ठेवत असेल, तर ‘रोटरी पिंक ऑटो’ ही तिच्यासाठी सुवर्णसंधी आहे. अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी इच्छुक महिलांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क : रो. भगवान पाटील (9922959355), रो. राजेश सामंत (9823666776)

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button