पालघर :
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षिका सौ. सुप्रिया यशवंत उराडे यांना महाविद्यालयाच्या प्रबंधक पदी बढती देण्यात आली आहे. सौ. सुप्रिया उराडे या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात गेल्या ३५ वर्षापासून सेवेत कार्यरत असून सध्या त्या महाविद्यालयाच्या कार्यालयात कार्यालयीन अधीक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
आपल्या महाविद्यालयातील सेवाकाळात त्या कोणत्याही गरीब, अपंग विद्यार्थ्यांची त्यांच्या शिक्षणाबाबत अडचण होणार नाही याची काळजी घेत असत. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत समस्या सोडविणे, नोकरी-व्यवसाय मार्गदर्शन करणे, त्यांचे जातीचे दाखले, जातवैधता प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे काढण्यासाठी त्यांना मदत व मार्गदर्शन करणे, विद्यार्थ्यांना वसतीगृह निवासासाठी मदत करणे अशी अनेक कामे त्यांनी पूर्ण केली. तसेच महाविद्यालयाच्या विविध अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून विद्यापीठ, सहसंचालक कार्यालय, शासन दरबारी त्यांची पूर्तता करण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी असलेल्या सौ. सुप्रिया उराडे या अतिशय गरिबीतून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन तत्कालीन प्राचार्य कै. ल. भा. मंत्री व कै. डॉ. अरुण पाध्ये यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे आपल्या कार्यालयीन सेवेची सुरुवात महाविद्यालयातच केली. महाविद्यालयाचे तत्कालीन प्रबंधक अनंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत कार्यालयात विविध स्तरावर त्यांची पदोन्नती करण्यात आली.
सुप्रिया उराडे यांच्या प्रबंधकपदावरील निवडीमुळे महाविद्यालयाच्या प्रशासकीय चौकडीला एक आधारस्तंभ मिळाला आहे असे गौरवोद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष सी.ए. सचिन गो. कोरे यांनीही सौ. सुप्रिया उराडे यांचे अभिनंदन केले.
सौ. उराडे यांनी यांचा त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि त्यांनी आदिवासी, गरीब, अपंग व सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या बहुमुल्य योगदानाबद्दल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई या संस्थेतर्फे ‘नारीरत्न’ पुरस्कार व ग्राहक संरक्षण फाउंडेशनकडून ‘सावित्रीच्या लेकी’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
