
डॉ. उज्ज्वला काळे या विद्यमान नगराध्यक्ष म्हणून शहराच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण करणार्या नेत्या ठरल्या. एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपमधून राजकीय प्रवास सुरू करून आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून त्यांनी प्रभाग क्रमांक 12 ‘ब’ (सर्वसाधारण महिला) मधून नगरसेवक पदाच्या निवडणूक लढवली. हा प्रभाग त्यांचा घरचा वॉर्ड मानला जातो. एकूण 1,553 मतदारांपैकी 1,067 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि या निवडणुकीत डॉ. काळे यांना लक्षणीय मते मिळाली.
पेशाने डॉक्टर असल्यामुळे त्यांचा थेट आणि जिव्हाळ्याचा संपर्क स्थानिक नागरिकांशी, विशेषतः महिला वर्गाशी कायम राहिला आहे. अनेक महिलांसाठी त्या केवळ लोकप्रतिनिधी नसून विश्वासू डॉक्टर आणि सल्लागार ठरल्या आहेत. या सामाजिक नात्याचा सकारात्मक परिणाम निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला.
गेल्या पाच वर्षांत प्रभागातील मूलभूत सुविधा, आरोग्यविषयक उपक्रम, स्वच्छता, रस्ते व नागरी सोयी-सुविधांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. ओघवते वक्तृत्व, अभ्यासपूर्ण मांडणी आणि लोकांच्या प्रश्नांकडे संवेदनशील दृष्टीने पाहण्याची त्यांची शैली मतदारांना भावणारी ठरली. ग्रामपंचायत काळापासून गेली पंचवीस ते तीस वर्षे त्यांनी कधीही निवडणुकीत हार मानलेली नाही. सातत्य, अनुभव आणि जनतेचा विश्वास या त्रिसूत्रीमुळेच डॉ. उज्ज्वला काळे यांना या निवडणुकीत भक्कम जनसमर्थन लाभले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
