काकांच्या पराभवाने प्रियांका म्हात्रे भाऊक!


विजयाच्या क्षणी अश्रूंना वाट मोकळी

पालघर : मंगेश तावडे
पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 अ मधून शिवसेनेच्या प्रियांका राजेंद्र म्हात्रे यांनी 923 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. भाजपच्या विदिशा माळी यांचा त्यांनी 338 मतांनी पराभव करत नगर परिषदेवर आपली पकड मजबूत केली. हा विजय साजरा करण्याऐवजी प्रियांका म्हात्रे यांच्यासाठी तो भावनिक ठरला. कारण याच प्रभागातील ‘ब’ मधून निवडणूक लढवणारे त्यांचे सख्खे काका रवींद्र उर्फ बंड्या म्हात्रे यांचा पराभव झाला आणि त्याच क्षणी प्रियांका भावुक झाल्या. मात्र, या राजकीय यशाच्या पार्श्वभूमीवर प्रियांका म्हात्रे यांच्या अश्रूंनी भरलेला हा क्षण पालघरच्या निवडणूक इतिहासात भावनिक आठवण म्हणून कायम राहणार आहे. प्रभाग क्रमांक 1 ब मधून शिवसेनेचे उमेदवार असलेले रवींद्र म्हात्रे यांना 731 मते मिळाली. त्यांच्याविरोधात मशाल चिन्हावर उभे असलेले आरिफ कलाडिया यांनी 809 मते मिळवत विजय संपादन केला.

पाच वर्षांपूर्वी याच प्रभागातून काका-पुतणी दोघेही मोठ्या फरकाने विजयी झाले होते. त्यामुळे या निवडणुकीतही दोघेही पुन्हा एकत्र नगर परिषदेवर पोहोचतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये होती. मात्र, यंदाच्या निकालाने हे चित्र बदलून टाकले. प्रियांका म्हात्रे यांच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. परंतु, काही क्षणांतच काकांच्या पराभवाची अधिकृत माहिती समोर येताच वातावरण बदलले.

आपल्या डोळ्यांसमोर उभ्या असलेल्या या वास्तवामुळे प्रियांका यांना भावना आवरता आल्या नाहीत. आनंदाच्या क्षणीच त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. विजयाचा आनंद साजरा करण्याऐवजी त्या थेट काका रवींद्र म्हात्रे यांच्या पराभवामुळे भाऊक झालेल्या दिसून आल्या. हा प्रसंग उपस्थित नागरिक, कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधींनाही भावूक करून गेला. प्रियांका म्हात्रे आणि रवींद्र म्हात्रे हे दोघेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत होते. एकाच कुटुंबातील उमेदवारांना यश आणि अपयशाचा असा अनुभव एकाच वेळी येणे दुर्मीळ असते.

राजकारणात विजय-पराभव ही प्रक्रियेचीच भाग असली तरी कौटुंबिक नातेसंबंधांवर त्याचा होणारा परिणाम या निकालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला. दरम्यान, पालघर नगर परिषदेत शिवसेनेचे उत्तम घरत नगराध्यक्षपदी निवडून आले. दरम्यान, पालघर नगर परिषदेत शिवसेनेचे उत्तम घरत नगराध्यक्षपदी निवडून आले असून, शिवसेनेने सत्तेवर आपली पकड मजबूत केली आहे. मात्र, या राजकीय विजयामागे लपलेली ही कौटुंबिक वेदना पालघरकरांसाठी भावनिक ठरली आहे. विजयी झालेल्या प्रियांका म्हात्रे स्वतः पेशाने वकील आहेत.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button