विनापरवानगी सुरू होते काम,
वाडा : तालुक्यातील घोणसई मेट ग्रामपंचायतीची ग्रामसभा जिल्हा परिषद शाळा घोणसई येथे सोमवारी सकाळी घेण्यात आली. या ग्रामसभेत ब्लॅक अँड व्हाईट इम्पेक्स लिमिटेड या लोखंड तयार करणा-या कंपनीच्या बांधकाम परवानगी बाबत ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला असता ग्रामसभेच्या अध्यक्षा शैला जाबर यांनी कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतीकडून देण्यात आले नसल्याचे ग्रामस्थांना सांगताच उपस्थित ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कमिटीसह थेट कंपनीच्या जागेत जाऊन कंपनीचे बांधकाम बंद पाडले. यावेळी ग्रामस्थ प्रचंड संतापले होते.

वाडा तालुक्यातील घोणसई ग्रामपंचायत हद्दीतील घोणसई गावालगत ब्लॅक अँड व्हाईट इम्पेक्स लिमिटेड या लोखंड तयार करणा-या कंपनीचे बांधकाम सुरू असून येथे आय बीम, टोर, सळ्या, अँगल्स, प्लेट, पाईप, टी एम टी आदी साहित्याचे उत्पादन करण्यात येणार आहे. या कंपनीचे बांधकाम सुरू असल्याने आज झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थ विकास घरत यांनी संबंधित कंपनीला परवानगी किंवा ग्रामपंचायतीकडून नाहरकत दाखला दिला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला असता त्यानंतर ग्रामस्थ वसंत पाटील, गितांजली शेलार, दुंदाराम शेलार, वैभव पाटील, गणेश सोनार, भाविका घरत, मनोज घरत, नितीन चौधरी आदी सर्वांनीच परवानगी किंवा नाहरकत दाखला नसताना कंपनीचे बांधकाम सुरू कसे आहे, असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर ग्रामसभेत हंगामा झाला. आत्ताच्या आता सर्व ग्रामस्थ व कमिटी कंपनीच्या जागेत जाण्याचा ग्रामस्थांनी आग्रह धरला. त्यानंतर ग्रामसभा संपताच ग्रामस्थ कंपनीच्या जागेवर जाऊन सुरू असलेले बांधकाम बंद पाडले.
प्रतिक्रिया
ब्लॅक अॅण्ड व्हाईट इम्पेक्स लिमिटेड या कंपनीने जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नसताना कंपनीने बांधकाम सुरू केले आहे. या संबंधित ग्रामस्थांनी ग्रामसभेत तक्रारी उपस्थित केल्या असता सर्व ग्रामस्थांच्या सहित आम्ही ग्रामपंचायत कमिटीने सुरू असलेले बांधकाम बंद पाडले आहे. या उपर कंपनीने बांधकाम पुढे सुरूच ठेवले तर वरिष्ठ कार्यालयांकडे पुढील पत्रव्यवहार केला जाईल. – शैला राजेश जाबर, सरपंच, ग्रामपंचायत घोणसई मेट
लोकवस्तीलगत सदर कारखान्याचे बांधकाम सुरू असल्याने या कंपनीच्या ध्वनी व वायु प्रदूषणामुळे आम्हा नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे आमचा या कारखान्याला विरोध आहे. – हर्षद घोडविंदे, ग्रामस्थ
