गायी-बैलांच्या जीवाशी खेळ; कचरा, रसायने व सांडपाणी उघड्यावर : पालकमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली
पालघर : मंगेश तावडे
नंडोरे-देवखोप ग्रामपंचायत हद्दीत काही कंपन्यांकडून पर्यावरणीय नियमांची खुलेआम पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून होत आहे. कंपन्यांकडून रॉ मटेरियलचे अवशेष, सांडपाणी, रसायने, प्लास्टिक कचरा तसेच फळांची आवरणे परिसरात उघड्यावर टाकली जात असल्याने पर्यावरणासह मुक्या जनावरांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

परिसरात फिरणाऱ्या गायी-बैलांकडून प्लास्टिक व इतर कचरा खाल्ला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. सांडपाणी व रसायनांमुळे जमीन आणि परिसरातील पर्यावरणावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. कचरा जाळला जात असल्याने धुराचा त्रास तसेच दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त असल्याची तक्रार आहे.
विशेष म्हणजे पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्ह्यात पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पालघर प्लास्टिक व कचरामुक्त करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, नंडोरे-देवखोपमधील परिस्थिती पाहता कंपन्यांवर प्रशासनाचा वचक आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

कंपनी प्रशासनाकडे विचारणा केली असता, “आजूबाजूच्या कंपन्याही प्रदूषण करतात; आम्ही एकटेच थोडे आहोत,” असा बचाव केला जात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे बोट दाखवत प्रदूषणाची जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे.‘

एका कंपनीला नोटीस दिली; प्लास्टिक व फळांची आवरणे जाळल्याची माहिती नाही’.
याबाबत ग्रामपंचायत अधिकारी श्री. देवरे यांच्याशी संपर्क साधला असता, पाणी प्रदूषण करणाऱ्या एका कंपनीला ग्रामपंचायतीने नोटीस बजावल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, प्लास्टिक कचरा व फळांची आवरणे जाळली जात असल्याची माहिती आपल्याला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कारखाने सांडपाणी सोडते…
ग्रामपंचायत हद्दीतच कचरा जाळला जात असेल, रसायने व सांडपाणी सोडले जात असेल आणि त्याची माहिती प्रशासनाला नसेल, तर पर्यावरणीय देखरेख नेमकी कोण करणार? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि उघड्यावर टाकलेला कचरा व घातक पदार्थ तत्काळ हटवावेत, अशी मागणी होत आहे.
