श्रेयांशच्या मृत्यूची एसआयटी चौकशी; दोषींवर कारवाईचा इशारा

पालघर : मंगेश तावडे

मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता पहिलीचा विद्यार्थी कु. श्रेयांश शैलेश आंबात याच्या मृत्यूने प्रशासन हादरले असून, घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास विभाग यांच्या मान्यतेने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूची कारणे, संभाव्य निष्काळजीपणा आणि संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यासह भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची शिफारस एसआयटी करणार आहे.

२४ ऑगस्ट रोजी श्रेयांशचा तापामुळे मृत्यू झाल्यानंतर २५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त आणि डहाणू प्रकल्प अधिकारी यांनी मासवण आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० विद्यार्थी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, बालरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने चार मुली व एका मुलाला मनोर ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

अन्न व औषध प्रशासनाने शाळेच्या स्वयंपाकघराची तपासणी करून मसाले, तेल व अन्य खाद्यसाहित्य नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. पाणी शुद्धीकरण व कीटक प्रतिबंधक उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला.शाळा चालविणाऱ्या आदिवासी सेवा मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, गंभीर निष्काळजीपणाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या अधीक्षकास तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. एसआयटीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button