वाडा नगरपंचायतीत राजकीय वाद; नगरसेवकांची तीव्र नाराजी
वाडा | प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या वाडा नगरपंचायत निवडणुकीत निर्वाचित झालेल्या नगराध्यक्षा रीमा गंधे यांच्या पदग्रहण सोहळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. वाडा नगरपंचायत कार्यालयात आयोजित या अधिकृत कार्यक्रमात काही नगरसेवकांना जाणूनबुजून डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येत असून, यामुळे नगरपंचायत वर्तुळात राजकीय खळबळ उडाली आहे.

या पदग्रहण सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे ११ व शिवसेनेचे ३ असे एकूण १४ नगरसेवक उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या नगरसेविका सुचिता पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नगरसेवक भूपेश जगताप आणि काँग्रेसच्या नगरसेविका भारती सपाटे यांना या सोहळ्यासाठी बोलावण्यात न आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत नगरसेविका सुचिता पाटील यांनी वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या नगरसेवकांना अधिकृत कार्यक्रमातून वगळणे हा लोकशाहीचा अवमान असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, “या पदग्रहण सोहळ्यासाठी कोणत्याही नगरसेवकांना अधिकृत निमंत्रण दिलेले नाही,” असे स्पष्ट केले. मात्र संबंधित नगरसेवकांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर संशय व्यक्त करत “आम्हाला जाणूनबुजून डावलण्यात आले,” असा ठाम आरोप केला आहे.
या घटनेमुळे वाडा नगरपंचायतीतील वातावरण तापले असून, आगामी नगरपंचायत कामकाजावर या वादाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने याबाबत स्पष्टता न दिल्यास हा वाद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
